जपान खुली बॅडमिंटन स्पर्धा

इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतर आता मंगळवारपासून टोक्यो येथे सुरू होणाऱ्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदाची कसर भरून काढण्याचे ध्येय भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने बाळगले आहे.

तंदुरुस्तीच्या कारणामुळे इंडोनेशियातील स्पर्धेला मुकलेली सायना नेहवाल जपान येथील स्पर्धेद्वारे कोर्टवर पुनरागमन करणार आहे. सिंधूला सात महिन्यांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची चांगली संधी मिळाली होती. मात्र जपानच्या अकाने यामागुची हिच्याकडून सरळ गेममध्ये पराभूत व्हावे लागल्याने सिंधूचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले होते. आता नव्या जोमाने मैदानात उतरून विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी सिंधू उत्सुक आहे. पाचव्या मानांकित सिंधूला पहिल्या फेरीत चीनच्या हॅन यू हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली तर तिला यामागुचीविरुद्धच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळेल.

आठव्या मानांकित सायनाला सलामीच्या लढतीत थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान हिच्याशी लढत द्यावी लागेल. बुसाननविरुद्ध सायनाने ३-१ अशी सरशी साधल्यामुळे या सामन्यात सायनाचे पारडे जड आहे. पुरुष एकेरीत, एच. एस. प्रणॉय आणि आठव्या मानांकित किदम्बी श्रीकांत यांच्यातच सलामीची लढत रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे दोघेही पाच वेळा एकमेकांशी भिडले असून श्रीकांतने चार वेळा बाजी मारली आहे. त्याचबरोबर बी. साईप्रणीथ याच्यासमोर पहिल्याच फेरीत खडतर आव्हान असणार आहे. त्याला सलामीलाच जपानच्या केंटा निशिमोटोशी लढत द्यावी लागेल. समीर वर्माचा पहिला सामना डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसेन याच्याशी होईल.

पुरुष दुहेरीत, सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्यासमोर इंग्लंडच्या मार्कस इलिस आणि ख्रिस लॅनग्रिज यांचे आव्हान असेल. मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी यांची गाठ मलेशियाच्या गोह झे फेई आणि नूर इझूद्दीन यांच्याशी पडेल. महिलांमध्ये अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांना कोरियाच्या किम सो येओंग आणि काँग ही योंग यांच्याशी दोन हात करावे लागतील. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी यांची लढत झेंग सी वेई आणि हुआंग या किआँग यांच्याशी होईल.