ज्या ऑस्ट्रेलिया संघाने कधी क्रिकेटच्या जगावर राज्य केलं आणि आपला दबदबा निर्माण केला त्यांचं आता गर्वहरण झाल्याचं चित्र आहे. क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात नेहमी अव्वल असणारा हा संघ सध्या कधी नव्हे तेवढ्या वाईट फॉर्ममधून जातोय. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरुद्ध 5 वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिले 2 सामने गमावल्याचा जबर फटका 5 वेळचा विश्वविजेता असलेल्या या संघाच्या एकदिवसीय क्रमवारीवर पडला आहे.

आयसीसीने यासंदर्भातली ताजी क्रमवारीत नुकतीच जाहीर केली आहे. गेल्या 34 वर्षांमध्ये कधीही न आलेल्या नामुष्कीचा सामना ऑस्ट्रेलियाच्या संघाला कारावा लागतोय. कारण एकदिवसीय क्रमवारीत ते थेट सहाव्या स्थानावर फेकले गेलेत. याआधी 1984 साली ऑस्ट्रेलियाच्या संघावर अशी वेळ आली होती. ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचा फायदा पाकिस्तान संघाला झाला असून ते क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आले आहेत. आता क्रमवारीत आपलं स्थान सुधारण्यासाठी ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्धच्या उर्वरीत तीनपैकी किमान एक सामना जिंकणं अत्यावश्यक आहे.

गेल्या दोन वर्षांपासून ऑस्ट्रेलियाचं प्रदर्शन त्यांच्या लौकिकास साजेसं राहिलेलं नाही. दोन वर्षांपूर्वी ते एकदिवसीय क्रमवारीत एक नंबरवर होते. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर त्यांना 5-0 ने व्हाइटवॉशचा सामना करावा लागला. त्यानंतर शेवटच्या 15 सामन्यांपैकी 13 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. यादरम्यान त्यांनी न्यूझीलंड, भारत आणि इंग्लंडविरुद्धची द्विपक्षीय मालिका गमावली.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा वन-डे सामना 19 जून रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून गेलेली इज्जत वाचवण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असणार आहे.