हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघानी पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मात केली. ५ सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला सध्या १-० ने आघाडीवर आहेत. या विजयासोबतच भारताची सलामीवीर स्मृती मंधानाच्या नावावर अनोखा विक्रम जमा झाला आहे. आफ्रिकेविरुद्धचा पहिला टी-२० सामना हा स्मृती मंधानाचा सलग ५० वा टी-२० सामना ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग ५० टी-२० सामने खेळणारी स्मृती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. याआधी भारतीय पुरुष आणि महिला संघातील कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आली नव्हती. याआधी हरमनप्रीत कौरने २००९ ते २०१४ दरम्यान भारताकडून सलग ४९ टी-२० सामने खेळले होते. आता हा विक्रम स्मृतीच्या नावे जमा झाला आहे. स्मृतीने जुलै २०१५ पासून आतापर्यंतल सलग ५० टी-२० सामने खेळले आहेत.

मंगळवारी पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १३० धावा करत दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला विजयासाठी १३१ धावांचे आव्हान दिले होते. भारताकडून हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली, तर स्मृतीने २१ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून शब्निम इस्माइलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.