भारताचा सोमदेव देववर्मनने येथील एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळवताना ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने सर्वाधिक वेळ चाललेल्या लढतीत अमेरिकेच्या डॅनियल निग्वेनला ७-५, ४-६, ७-६ (७-५) असे हरवले. सोमदेव याचे कारकीर्दीतील पाचवे एटीपी विजेतेपद आहे. त्याने तीन तास ३१ मिनिटांनंतर हा सामना जिंकला. या स्पर्धेतील हा सर्वात दीर्घकाळ चाललेला अंतिम सामना होता. तिसऱ्या सेटमध्ये ३-३ अशी बरोबरी असताना पावसामुळे सामन्यात व्यत्यय निर्माण झाला. त्यामुळे हा सामना इनडोअर सभागृहात घेण्यात आला. ‘‘या सामन्यातील खेळाबाबत मी खूप समाधानी आहे. मॅचपाँइट्सच्या वेळी माझा खेळ सर्वोत्तम होता. संघर्षपूर्ण लढतीची अखेर विजेतेपदामध्ये झाल्यामुळे मला विशेष आनंद झाला,’’ असे सोमदेवने सांगितले. सोमदेवने फेब्रुवारीत दिल्ली खुली टेनिस स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्याने १३ स्पर्धामध्ये भाग घेतला. त्यापैकी एकाही स्पर्धेत त्याला पात्रता फेरीत किंवा मुख्य फेरीतील दुसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला आहे. या विजेतेपदामुळे त्याने जागतिक क्रमवारीत १७३व्या स्थानावरून १४८व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.