बॅँकॉक : आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतच्या दोन बॉक्सर्सनी दमदार सुरुवात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. सोनिया चहलने ५७ किलो वजनी गटात तर सतीश कुमारने ९१ किलोपेक्षा अधिक वजनी गटात विजय मिळवत भारताची पदके निश्चित केली आहेत.

सतीशने इराणच्या इमान रामेझानपोरुडेलावर मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर सोनियाने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या व्हिएतनामच्या उयान दो न्हा हिला पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची कामगिरी करून दाखवली.

त्याआधी भारताच्याच रोहित टोकस (६४ किलो), दीपक (४९ किलो)आणि आशिष (६९)यांनी आपापल्या वजनी गटात उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.  दीपकने व्हिएतनामच्या लोऊ बुई कॉँग डान्हवर संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवत एकतर्फी विजय मिळवला. दीपकच्या ठोशांमधील अधिक ताकद निर्णायक ठरली, तर रोहितने तैवानच्या चू येन लायवर संघर्षपूर्ण विजय मिळवला.

रोहितने प्रारंभापासून आक्रमक खेळ केला. त्यामुळे लायला रोहितपासून बचाव करणे अनेकदा शक्य झाले नाही. तसेच आशिषने कंबोडियाच्या व्ही.वाय. सोफोर्स याच्यावर मात केली. आता पुढील फेऱ्यांमध्ये हे तिघे बॉक्सर्स कसा खेळ करतात, यावर त्यांचे पदक निश्चित होणार आहे.

या स्पर्धेतील सर्व सुवर्णपदक विजेत्यांना सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत निश्चितपणे स्थान मिळू शकेल, असे भारताचे उच्च कामगिरी संचालक सॅँटिएगो निएव्हा यांनी सांगितले.