भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली अशी माहिती हॉस्पिटलमधील सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यावर आज सांयकाळी अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया होणार आहे.

हॉस्पिटलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. त्यानंतर लगेचच त्याला जवळच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला शुक्रवारी रात्रीपासूनच बरं वाटत नव्हतं. पण शनिवारी त्याने दैनंदिन वेळापत्रकानुसार काम करण्यास सुरूवात केली. सकाळी जिममध्ये व्यायाम करतानाच त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. डॉक्टर्स त्याच्यावर उपचार करत असून हृदयविकाराचा झटका आल्यानेच असं घडलं असल्याची शक्यता सूत्रांनी इंडियनएक्सप्रेस.कॉमशी बोलताना वर्तवली. गांगुलीबद्दलची माहिती ऐकताच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ट्विट करत चिंता व्यक्त केली.

“गांगुलीला हृदयाच्या त्रासामुळे वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या गांगुलीची प्रकृती स्थिर आहे असे हॉस्पिटलमधील सूत्रांनी सांगितलं आहे. काही तासांतच गांगुलीला डिस्चार्जही दिला जाऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे. व्यायाम करत असताना त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. त्यानंतर त्याच्या वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यात त्याला हृदयाचा विकार असल्याचे निष्पन्न झालं. डॉ. सरोज मोंडल यांच्यासह तीन डॉक्टरांची टीम गांगुलीवर उपचार करत आहे”, अशी माहिती ज्येष्ठ क्रीडा पत्रकार बोरिया मजुमदार यांनी दिली.

भारतीय संघाचा आक्रमक कर्णधार म्हणून गांगुलीची ओळख आहे. २००३ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने १९८३ नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर नॅटवेस्ट सीरिजमध्ये भारताने धोबीपछाड दिला होता. त्या विजयानंतर लॉर्ड्सच्या गॅलरीत गांगुलीने टी-शर्ट काढून फिरवलेला साऱ्यांच्या आजही लक्षात आहे. BCCI अध्यक्ष झाल्यानंतरही गांगुलीने अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत. करोना संकटातही IPL2020चे आयोजन यशस्वीरित्या पार पाडण्यात गांगुलीचा मोलाचा वाटा होता.