भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. BCCI च्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या तुलनेत गांगुलीचे पारडे जड मानले जात आहे. गांगुलीला पटेल यांच्यापेक्षा अधिक पसंती मिळत असल्याची माहिती आहे. सौरव गांगुलीची BCCI च्या अध्यक्षपदी निवड झाली, तर तो या पदावर २०२० पर्यंत कार्यरत राहील. या शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांची सचिव, तर अरुण धुमाळ यांची खजिनदारपदी निवड होण्याची शक्यता आहे.

BCCI ची २३ ऑक्टोबरला होणारी वार्षिक सर्वसाधारण सभेतील निवडणूक बिनविरोध पार पडावी, या दृष्टीने रविवारी विविध राज्य संघटनांची अनौपचारिक बैठक मुंबईत झाली. पण अध्यक्षपदासाठी भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या नावाबाबत रात्री उशिरापर्यंत एकमत होऊ शकले नाही. असे असले तरी सौरव गांगुलीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आधीच सेलिब्रेशन सुरू केले आहे. बंगालचा वाघ पुन्हा एकदा येत आहे, आता BCCI मध्ये ‘दादा’गिरी होणार  अशा आशयाची ट्विट करत चाहत्यांनी सोशल जल्लोष करण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, BCCI च्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत आहे.  या बैठकीत विविध नावांवर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय यांना सचिवपद आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे भाऊ अरुण सिंग धुमाळ यांच्या नावांबाबत संघटनांचे एकमत झाले. जय हे गुजरात क्रिकेट संघटनेचे आणि अरुण सिंग धुमाळ हे हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी आहेत. आसामच्या देबाजित सैकिया यांना संयुक्त सचिवपदासाठी उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.