फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्यामुळे चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची पहिल्या डावात ६ बाद ८८ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. त्याआधी आफ्रिकेच्या गोलंदाजांनी इंग्लंडला पहिल्या डावात ४०० धावांवर रोखले. आनरिख नॉर्किएने पाच बळी घेतले. त्यानंतर मार्क वूडने तीन बळी घेत आफ्रिकेच्या फलंदाजांना मैदानावर स्थिरावू दिले नाही. क्विंटन डी कॉक ३२ धावांवर खेळत आहे. दरम्यान, इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सला चाहत्याला उद्देशून भाष्य केल्याबद्दल सामन्याच्या मानधनाच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.