क्रिकेटचे मैदान कायम अनिश्चित घटनांसाठी ओळखले जाते. क्रिकेटच्या मैदानावर फलंदाज आणि गोलंदाज यांच्या सेलिब्रेशनच्या वेगवेगळ्या शैली कायम चर्चेत असतात. प्रत्येकाची आनंद साजरा करण्याची एक वेगळी स्टाईल असते. काही खेळाडू गडी बाद केल्यावर रागाने हातवारे करतात, तर काही खेळाडू हसत-खेळत आनंद व्यक्त करतात. मात्र एका खेळाडूने चक्क मैदानावरच जादू करून दाखवली आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे.

Mzansi Super League 2019 या दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या स्पर्धेत एक आश्चर्यकारक घटना घडली. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या एका गोलंदाजाने फलंदाजाला बाद केले आणि चक्क मैदानावर हातचलाखी (जादू) दाखवली. Mzansi Super League 2019 या स्पर्धेत Paarl Rocks संघाकडून खेळताना गोलंदाज तबरेज शम्सीने प्रतिस्पर्धी संघातील Durban Heat चा आक्रमक फलंदाज डेव्हिड मिलरला बाद केले. त्याला बाद केल्यानंतर शम्सी चक्क मैदानावर जादूगार बनला.