भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघांदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीने आक्रमक शतक झळकवलं. सेंच्युरिअन कसोटीत शतक झळकावल्यानंतर विराटने नेहमीप्रमाणेच आवेगात या शतकाचा आनंद साजरा केला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव, वेडिंग रिंगला त्याने घेतलेलं चुंबन या सर्व गोष्टींकडे त्यावेळी मैदानावर उपस्थित सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्याचा उत्साह योग्य होताच पण, त्यातून नकळतपणे येणारे चिथावणीखोर भाव पाहून आपल्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही, असे वक्तव्य दक्षिण आफ्रिकेच्या जलदगती गोलंदाज मोर्ने मॉर्केलने केले.

दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसअखेर सामन्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोर्नेने हे वक्तव्य केले. ‘विराट स्पर्धात्मक वृत्तीचा खेळाडू आहे. किंबहुना संपूर्ण भारतीय संघ येथे स्पर्धात्मक वृत्तीनेच आला आहे. त्यांच्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याचीही क्षमता आहे’, असे मोर्ने म्हणाला. विराटविषयी त्याने केलेल्या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. ‘मैदानावर आक्रमकपणे एखाद्या गोष्टीचा आनंद व्यक्त करणे हा त्याचा (विराटचा) स्वभावच आहे. या गोष्टीमुळे त्याला प्रोत्साहन मिळते, पुढे जाण्याची उर्जा मिळते. याविषयी दक्षिण आफ्रिका संघातील सर्व खेळाडू जाणून आहेत. पण, त्याकडे आम्ही फारसे लक्ष देत नाही, त्याचा आमच्यावर परिणाम होत नाही’, असे तो म्हणाला.

पाहा : Throwback Thursday : जुन्या जाहिरातींचा खजाना

मोर्नेने यावेळी भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खेळाचीही प्रशंसा केली. सेंच्युरिअनच्या खेळपट्टीच्या अनुशंगाने गोलंदाजी करत बुमराहने योग्य खेळ दाखवला, असेही तो म्हणाला. त्यानंतर त्याने दिवसभराच्या खेळावरही आपले मत मांडले. खेळपट्टी, दोन्ही संघांची त्या दिवसाची कामगिरी याविषयीसुद्धा त्याने आपले विचार मांडले. पण, माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या या वक्तव्यांमध्ये मोर्नेने विराटविषयी दिलेल्या प्रतिक्रियेलाच अनेकांनी उचलून धरले.