दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी २० सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा २७ धावांनी पराभव केला. मात्र दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील पहिला व दुसरा सामना जिंकला असल्याने त्यांनी मालिका २-१ ने आपल्या नावे केली. या बरोबरच आफ्रिकेने पाकिस्तानची सलग ११ टी२० मालिका जिंकण्याची घोडदौडही रोखली.

अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने २० षटकांत ९ बाद १६८ धाव केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिजवानने २६, आसिफ अलीने २५ आणि बाबर आझमने २३ धावा केल्या. याशिवाय शेवटच्या काही षटकात शादाब खानने ८ चेंडूत ३ षटकारांसह २२ धावा करत महत्वपूर्ण भूमिका बजावली. आफ्रिकेकडून ब्यूरान हेंडरिक्सने ४ षटकांत १४ धावा देत ४ गडी टिपले.

या आव्हानाचा पाठलाग आफ्रिकेची सुरूवात खराब झाली. त्यांचे सुरूवातीचे तीन फलंदाज ३० धावांत तंबूत परतले. क्रिस माॅरिसने २९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारच्या मदतीने नाबाद ५५ धावा केल्या. रैसी वॅन डर हुसेनने ३५ चेंडूत ४१ धावा करत त्याला चांगली साथ दिली. पण इतर एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आफ्रिकेला २७ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने ३ गडी बाद केले. शादाब खानला सामनावीर घोषित करण्यात आले.