दीपक जोशी

बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोतर्झा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील नवव्या सामन्यात नेतृत्व करताना हबिबुल बशरशी बरोबरी करणार आहे. आतापर्यंत विश्वचषकात श्रीलंकेचा बांगलादेशशी तीनच वेळा सामना झाला असून, हे सर्व सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. २००३ मध्ये १० गडी राखून, २००७ मध्ये १९८ धावांनी आणि २०१५ मध्ये ९२ धावांनी श्रीलंकेने हे सामने जिंकले आहेत. यापैकी २००७ आणि २०१५ मध्ये श्रीलंकेने तीनशे धावसंख्येचा टप्पा पार केला आहे. मंगळवारी मुशफिकर रेहमान, शाकिब अल हसन आणि तमिम इक्बाल हे बांगलादेशचे तीन खेळाडू विश्वचषकातील २५वा सामना खेळणार आहेत. यात शाकिब (७३९ धावा) धावांमध्ये अग्रस्थानावर आहे. लसिथ मलिंगासुद्धा विश्वचषकातील २५वा सामना खेळत असून मुथय्या मुरलीधरन, सनथ जयसूर्या व चामिंडा वास यांच्यानंतर गोलंदाजीच्या पंक्तीत चौथे स्थान मिळवण्यासाठी त्याला अजून चार बळींची आवश्यकता आहे.