गौरव जोशी

कुकाबुरा म्हटले की कुणालाही त्या ब्रँडच्या चेंडूचीच आठवण होते. विश्वचषक आणि कसोटी सामन्यांतही कुकाबुरा चेंडूच वापरले जातात; पण ही कंपनी बॅटचेदेखील उत्पादन करते. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नची ही कंपनी आहे; पण इंग्लंडमध्ये कॉरबी नावाच्या एका गावात त्यांचा कारखाना आहे. या कारखान्यात बॅटचे उत्पादन होते. भारतात मीरतमध्येही बॅटचे उत्पादन होते.

कॉरबी गावाच्या आजूबाजूला असलेल्या जंगलातून हे विशेष लाकूड इथे आणले जाते. ते लाकूड साफ करण्यासाठी कॉरबीच्या कार्यशाळेमध्ये येते. बॅट उत्पादन ही वेगळीच बाब आहे; पण त्यासाठीची पूर्वतयारी ही अजून वेगळीच कला आहे. मेलबर्नमधील लॉकी डिंगर नावाचा मुलगा हा १४ वर्षांचा असताना तो बॅट उत्पादनाच्या कामात लागला. त्यानंतर गेली ११ वर्षे तो हेच काम करीत आहे. यंदाच्या विश्वचषकात तब्बल १६ फलंदाज कुकाबुराची बॅट वापरत आहेत. त्यामुळेच लॉकीला खास कंपनीने त्यांच्या बॅटच्या देखभालीसाठी कॉरबीच्या कार्यशाळेमध्ये आणून ठेवले आहे. त्याबाबतचे अनेक किस्सेदेखील त्याने सांगितले.

१६ फलंदाज जे कुकाबुरा वापरतात, त्यातील बहुतांश फलंदाज हे ऑस्ट्रेलियाचे आहेत. त्यातील एक म्हणजे ग्लेन मॅक्सवेल. मॅक्सवेलला त्याची बॅट एकदम चकाचक लागते. त्यामुळे दोन-तीन सामन्यांनंतर तो पुन्हा त्याची बॅट सफाईला पाठवतो. त्या बॅट साफ करून लॉकी त्याच्याकडे पाठवतो. मॅक्सवेलकडे सहा-सात बॅट असल्याने तो एक-दोन बॅट पाठवून त्या सातत्याने सफाई करून घेत असतो. विश्वचषकासाठी नुकत्याच त्याने तीन बॅट साफ करून घेतल्या आहेत.

याशिवाय आणखी एक फलंदाज बॅटच्या सफाईबाबत अत्यंत दक्ष आहे, तो म्हणजे मार्नस लॅबोशेन. तो ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघातून खेळतो. बॅटला एकही डाग त्याला चालत नाही. त्याची बॅट बनवणे म्हणजे डोकेदुखीच असल्याचेही लॉकीने सांगितले. ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक अ‍ॅलेक्स कॅरे हा सातव्या क्रमांकावर म्हणजेच अखेरच्या हाणामारीच्या षटकांमध्ये येत असल्याने त्याला त्याच्या बॅटचे वजन थोडे अधिक हवे होते. त्यानुसार त्याला बॅट तयार करून दिली.

न्यूझीलंडचा टॉम लॅथम हादेखील बॅटबाबत खूप सजग आहे. प्रत्येक बॅटवर उभ्या रेषा असतात, त्याला ‘ग्रेन्स’ असे म्हणतात. त्या आपल्या बॅटवर केवळ बाराच हव्यात, अशी त्याची मागणी होती. अशा बऱ्याच गमतीजमती या कुकाबुराच्या कारखान्यात गेल्यावर कळतात. त्या कारखान्यात मागच्या बाजूला गोदामात गेल्यावर सगळीकडे लाकडेच लाकडे दिसतात. त्या सर्व लाकडांवर प्रत्येकाची श्रेणी लिहिलेली असते. त्यावर १, २.. अशा श्रेणी दिसल्यावर उत्सुकता अधिकच चाळवते. त्यातील १ क्रमांकाची श्रेणी म्हणजे सर्वोत्तम श्रेणीचे लाकूड असून ते लाकूड कुठल्या जंगलातून आले आहे, तेदेखील त्यावर नमूद केलेले असते. त्यामुळे विश्वचषकात तुम्ही जेव्हा कुकाबुराचे नाव पाहाल, तेव्हा चेंडूबरोबरच बॅटचेदेखील स्मरण तुम्हाला होईल. तसेच कुकाबुराच्या बरोबरीने कॉरबी या गावाचीदेखील तुम्हाला आठवण होईल. जॉस बटलरचादेखील अजून एक किस्सा लॉकीने सांगितला. प्रत्येक बॅटवर तो एक शिवी लिहून ठेवतो. हे ऐकल्यावर हसू आल्याशिवाय राहावत नाही.