खेळात भरपूर पैसा खळखळू लागला की अनेकांना संघटनेची खुर्ची हवीहवीशी वाटते. नेमबाजीतही असेच पाहावयास मिळत आहे. या खेळात पैसा दिसू लागल्यानंतर नव्वदाव्या वर्षीही कर्नल (निवृत्त) जसवंतसिंग यांना राष्ट्रीय रायफल नेमबाजी संघटनेच्या मानद चिटणीसपदाची खुर्ची प्यारी वाटू लागली आहे.
कोणत्याही खेळांच्या राष्ट्रीय किंवा राज्य संघटनांचे पदाधिकाऱ्यांचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त असू नये असे शासनाने त्यांच्या क्रीडाधोरणात कळविले असले तरी नेमबाजी संघटनेतील पदाधिकारी या नियमांबाबत फारसे गंभीर दिसत नाहीत. संघटनेतील बरेचसे पदाधिकारी ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. आगामी निवडणुकीतही हेच पदाधिकारी पुन्हा सत्तेच्या खुर्चीकरिता उत्सुक झाले आहेत. संघटनेच्या मानद चिटणीसपदी जसवंतसिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेचे चिटणीस राजीव भाटिया यांनी या नियुक्तीचे समर्थन करताना सांगितले, जसवंतसिंग यांनी क्रीडा संघटक म्हणून अनेक वर्षे अनेक पदांची जबाबदारी यशस्वीरीत्या हाताळली आहे. संघटनेचे अध्यक्ष रणधीरसिंग यांनीच ही नेमणूक केली आहे. जसवंतसिंग यांनी १९७०च्या दशकांत संघटनेवर काम केले आहे. आर्थिक निधीचा गैरव्यवहार केल्याचे आरोप ठेवल्यानंतर संघटनेचे मानद सचिव कन्वर रणधीरसिंग यांनी पदाचा राजिनामा दिला होता. त्यांच्या जागी जसवंतसिंग यांना नेमले आहे. संघटनेचे सल्लागार बलजितसिंग सेठी, वरिष्ठ उपाध्यक्ष अवतारसिंग सेठी हे सत्तरी ओलांडलेले संघटक आहेत. प्रभारी सरचिटणीस एस. जगतसिंग सेठी, तसेच किशन अवतन, कमल मोंगा हे कार्यकारिणी सदस्य ८० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. प्रा. सनी थॉमस, डी. के. शुक्ला हे ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.