कलमाडी, चौताला निवड प्रकरण

भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या सुरेश कलमाडी आणि अभय सिंग चौताला यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) आजीव अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल क्रीडा मंत्रालयाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

या प्रकरणी क्रीडा मंत्रालयाने ‘आयओए’ला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने ‘आयओए’ला शुक्रवापर्यंतची मुदत दिली होती. या मुदतीमध्ये ‘आयओए’ने क्रीडा मंत्रालयाला उत्तर पाठवले नसल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ‘आयओए’चे अध्यक्ष एन. रामचंद्रन हे भारताबाहेर असल्याने ‘आयओए’ला मुदतीच्या कालावधीत उत्तर देणे जमले नसल्याचे काही जणांचे म्हणणे आहे.

‘‘चुकीच्या गोष्टींना सरकार कधीही मान्यता देणार नाही. ‘आयओए’ला आम्ही ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली होती, त्याचे गांर्भीय घेण्याऐवजी १५ दिवसांची मुदत मागितली. त्यामुळे सरकारने ‘आयओए’वर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत कलमाडी आणि चौताला यांच्या निवडीचा निर्णय ‘आयओए’ मागे घेत नाही, तोपर्यंत आमचा हा निर्णय कायम असेल,’’ असे केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सांगितले.

‘‘निलंबनाची कारवाई ‘आयओए’वर करण्यात आल्यामुळे त्यांचे कामकाज करण्याचे अधिकार राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला देण्यात आले आहेत. जोपर्यंत ‘आयओए’ आपला निर्णय मागे घेत नाही आणि त्यांच्यावरील निलंबन उठत नाही, तोपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक साहाय्य, सुविधा देण्यात येणार नाहीत. त्याचबरोबर त्यांच्याकडे कोणतेही विशेषाधिकार राहणार नाहीत,’’ असे गोयल म्हणाले.

‘‘नियमांचे उल्लंघन केल्यामुळेच आम्ही ‘आयओए’वर ही कारवाई केली आहे. ‘आयओए’ ही भारतातील मातृसंघटना आहे. हे प्रकरण राष्ट्रीय प्रतिष्ठा आणि सार्वजनिक भावनेशी संबंधित आहे. त्यामुळे जर काही चूक होत असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई नक्कीच करायला हवी,’’ असे गोयल म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ‘‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या घटनेमध्ये याबाबत काही गोष्टी स्पष्ट नमूद केल्या आहेत. नियमानुसार, जर एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असेल तर त्या व्यक्तीला संघटनेमध्ये स्थान देता येऊ शकत नाही. सुशासन आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’’

‘आयओए’ची २७ डिसेंबरला वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. या सभेत कलमाडी आणि चौताला यांची निवड करण्यात आली होती.

नरेंद्र बात्रा यांचा उपाध्यक्षपदाचा राजीनामा

सुरेश कलमाडी आणि अभय सिंग चौताला यांना भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) आजीव अध्यक्षपद दिल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी नरेंद्र बात्रा यांनी सहयोगी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

आयओएचे अध्यक्ष एन. रामचंद्रन आणि सचिव राजीव मेहता यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात बात्रा यांनी म्हटले आहे की, ‘‘वार्षिक सर्वसाधारण सभेला तीन दिवस झाल्यानंतरही आयओएने कोणतीही कारवाई करून कलमाडी आणि चौताला यांचे आजीव अध्यक्षपद काढून घेतले नाही. याचा निषेध आणि आक्षेप नोंदवण्याच्या हेतूने मी आयओएच्या सहयोगी उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.’’