आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंगबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नियुक्त केलेल्या आर. एन. सवानी या एक सदस्यीय समितीने आपला अंतरिम अहवाल सादर केला. राजस्थान रॉयल्सचे खेळाडू एस. श्रीशांत, अजित चंडिला व अंकित चव्हाण या खेळाडूंनी केलेल्या स्पॉट-फिक्सिंगबाबत मंडळाने ज्येष्ठ सनदी अधिकारी सवानी यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपविली होती.
श्रीशांत व चंडिला हे पोलीस कोठडीत असल्यामुळे व चव्हाण हा विवाहामुळे उपलब्ध नसल्यामुळे या खेळाडूंच्या चौकशीविनाच त्यांना अहवाल सादर करावा लागला आहे. मंडळाने पोलिसांना या खेळाडूंची चौकशी करण्यास परवानगी मागितली होती. हे खेळाडू स्पॉट-फिक्सिंगकडे कसे वळले, याचप्रमाणे या खेळाडूंचे सट्टेबाजांशी झालेले संवाद यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी सवानी यांना माहिती दिल्याचे समजते.