ड्रग्ज म्हणजेच अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज शेहान मधुशंकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. श्रीलंकन पोलिसांनी सोमवारी अटक केली होती. मधुशंका राहत असलेल्या पनाला या भागात लंकन पोलिसांनी कारवाई केली. कारवाई दरम्यान त्याच्या गाडीमध्ये दोन ग्रॅम हेरॉईन (ड्रग्ज) आढळून आले. करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी श्रीलंकादेखील लॉकडाउन आहे. या काळात लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

लॉकडाउन काळात श्रीलंकन पोलिसांकडून एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्या नियमांचे पालन व्हावे म्हणून श्रीलंकन पोलीस तत्पर आहेत. मधुशंका एका व्यक्तीसोबत आपल्या कारमधून प्रवास करत होता, तेव्हा पोलिसांनी त्याची कार थांबवली आणि तपासली. त्यावेळी त्याच्या कारमधून दोन ग्रॅम हेरॉईन सापडले. त्यानंतर त्याला चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर अटक करून त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्याच्यावरील निलंबन कायम राहणार आहे.

जानेवारी २०१८ मध्ये मधुशंकाने वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण करताना तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत बांगलादेशविरुद्ध हॅटट्रीक नोंदवली होती. मश्रफी मोर्ताझा, रुबेल हुसेन आणि मेहमदुल्ला या फलंदाजांना मधुशनकाने बाद केलं होतं. मात्र यानंतर त्याला श्रीलंकेच्या संघात स्थान मिळालं नाही. आतापर्यंत त्याने २ टी-२० सामन्यात लंकेच्या संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. २०१८ निदहास चषकादरम्यान दुखापतीमुळे तो संघाबाहेर गेला होता.

दरम्यान, लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्या व्यक्तींविरोधात श्रीलंकन पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे. त्यात देशाच्या विविध भागातून अंदाजे ६५ हजार व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.