कोलंबो : आपल्या भेदक गोलंदाजीने श्रीलंकेच्या यशात अनेकदा मानकरी ठरलेला वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. त्यामुळे मलिंगाला विजयी निरोप देण्यासाठी श्रीलंका संघ उत्सुक आहे.

बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील विश्वचषक स्पर्धेतील सामना पावसाने होऊ शकला नव्हता. मात्र मलिंगाने खेळलेल्या बांगलादेशविरुद्धच्या १४ एकदिवसीय सामन्यांपैकी श्रीलंकेला फक्त तीनदाच पराभवाची नामुष्की सहन करावी लागली आहे. आता मलिंगाच्या निवृत्तीनंतर त्याची उणीव भरून काढण्याचे सर्वात मोठे आव्हान श्रीलंकेसमोर असेल. ३५ वर्षीय मलिंगा (२२५ सामन्यांत ३३५ बळी) हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणारा चामिंडा वास (३९९) आणि मुथय्या मुरलीधरन (५२३) यांच्यानंतरचा श्रीलंकेचा तिसरा गोलंदाज ठरला आहे.

युवा गोलंदाजांना संधी मिळेल -मलिंगा

लसिथ मलिंगा एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या १५ वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीची सांगता करणार आहे. मात्र या निर्णयाने युवा खेळाडूंना संधी मिळेल, याचा आनंद होत आहे, असे मलिंगाने सांगितले. ‘‘या क्षणी निवृत्त होताना मला आनंद होत आहे. युवा खेळाडूंना आता आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची तसेच पुढील विश्वचषकासाठी तयारी करण्याची संधी मिळेल. आम्हाला कदाचित काही धक्के बसतीलही, पण विश्वचषक जिंकण्याची क्षमता श्रीलंकेत आहे, हे नक्की. निवड समितीने दोन वर्षांपूर्वी मला संघाबाहेरचा रस्ता दाखवला होता. पण जगज्जेत्या इंग्लंडविरुद्धच्या साखळी सामन्यात चार बळी मिळवत मी माझी गुणवत्ता सिद्ध केली होती. त्यामुळे संघाबाहेर काढणाऱ्या खेळाडूंविरुद्ध तसेच पदाधिकाऱ्यांविरुद्ध माझ्या मनात कोणताही राग नाही,’’ असे श्रीलंकेला २०१४चा ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या मलिंगाने सांगितले.