कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणे हा एखाद्या क्रिकेटपटूसाठी मानाचा क्षण असतो. आपल्या कारकिर्दीत एकदा तरी द्विशतक झळकवावे असे प्रत्येक खेळाडूला वाटत असते. मात्र श्रीलंकेतील एका सामन्यात एका खेळाडूने चक्क एकाच सामन्याच्या दोनही डावात द्विशतक झळकावले आहे. नोनडेस्क्रप्टि्स क्रिकेट क्लबचा (एनसीसी) कर्णधार अँजेलो परेरा याने प्रथम श्रेणी सामन्यात प्रीमिअर लीगच्या साखळी फेरीत सिंहली क्रिकेट क्लबविरुद्धच्या चार दिवसीय सामन्यात हा पराक्रम केला.

अँजेलो परेराने प्रथम श्रेणी प्रीमिअर लीगच्या सामन्यात पहिल्या डावात २०१ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात त्याने २६८ चेंडूंमध्ये २३१ धावा बडवल्या. एससीसी मैदानावर हा सामना झाला. श्रीलंकेकडून आंतरराष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या धमिका प्रसाद आणि सचित्रा सेनानायके या गोलंदाजांचा मारा त्याने हाणून पाडला.

त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याने एका इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. या आधी १९३८ साली इंग्लिश कौंटी केंटचा फलंदाज आर्थर फॅग याने एसेक्स क्लबविरुद्ध एकाच सामन्यातील पहिल्या डावात २४४ आणि दुसऱ्या डावात नाबाद २०२ धावांची खेळी केली होती. त्यानंतर असे करणारा अँजेलो परेरा दुसरा क्रिकेटपटू ठरला.

दरम्यान, प्रीमिअर लीगच्या हंगामात अनेक फलंदाजांनी द्विशतक झळकावले आहे. मात्र, परेरा याने एकाच सामन्यात दोन द्विशतके ठोकून ऐतिहासिक कामगिरी केली.