‘‘स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील विजेतेपदानंतर ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी ठेवण्याचे माझे ध्येय आहे,’’ असे भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याने सांगितले.
जागतिक क्रमवारीत श्रीकांतला चौथे स्थान आहे. ही मजल गाठणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे. त्याने गेल्या सहा महिन्यांमध्ये चायना खुल्या स्पर्धेतील विजेतेपदासह अनेक स्पर्धामध्ये अव्वल कामगिरी केली आहे. त्याने नुकतेच बेसेल येथे झालेल्या स्विस खुल्या स्पर्धेत अजिंक्यपद मिळविताना गतविजेता व्हिक्टर अ‍ॅक्सलेन याच्यावर सनसनाटी विजय
मिळविला. विजेतेपदाबाबत श्रीकांत म्हणाला, ‘‘या सामन्यात विजय मिळविणे अतिशय आव्हानात्मक होते. त्यातही गतविजेत्या खेळाडूविरुद्ध सामना खेळण्याचे थोडेसे दडपण होते मात्र मी सर्वोत्तम खेळ करण्याचे ध्येय ठेवीतच खेळलो व त्यामुळेच मला विजेतेपद मिळाले.’’
श्रीकांतने पुढे सांगितले, ‘‘दुसऱ्या गेममध्ये माझ्याकडून नकळत चुका होत गेल्या. त्याचा फायदा माझ्या प्रतिस्पर्धी खेळाडूस मिळाला. तिसऱ्या गेममध्ये मला पुन्हा सूर गवसला. मी आक्रमक खेळ करण्यावर भर दिला व माझा हेतू सफल झाला. जागतिक स्पर्धेत पदक मिळविण्याचे माझे ध्येय आहे. तसेच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान घेण्याचेही माझे स्वप्न आहे. त्याकरिता खेळाच्या प्रत्येक आघाडीवर सुधारणा करण्यावर मी सरावात भर देत आहे.’’

ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्यासाठी जागतिक क्रमवारीत पहिल्या सोळा खेळाडूंमध्ये स्थान आवश्यक आहे. ऑलिम्पिकसाठी अद्याप दीड वर्षे बाकी आहेत. तोपर्यंत पहिल्या पाच क्रमांकांमध्ये राहण्यासाठी मला आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सातत्यपूर्ण खेळ करावा लागणार आहे.   त्याकरिता खेळाच्या प्रत्येक आघाडीवर लक्ष ठेवून त्यात सुधारणा करण्यावर मी सरावात भर देत आहे.
– श्रीकांत किदम्बी