किदम्बी श्रीकांत, पी. व्ही. सिंधू, सायना नेहवालवर भारताच्या आशा

अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सुदिरमन चषक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांच्याकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. भारतीय संघाला या स्पर्धेत अद्याप एकदाही उपांत्य फेरीत पोहोचता आलेले नसल्याने रविवारपासून प्रारंभ होणाऱ्या या स्पर्धेत भारतासमोर कामगिरी उंचावण्याचे आव्हान असेल.

भारतीय संघ यापूर्वी २०११ आणि २०१७ साली उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचला होता. मात्र त्यापुढे भारताला मजल मारता आली नाही. ‘१ड’ या गटातून पुढे जाण्यासाठी भारतासमोर बॅडमिंटनमध्ये बलाढय़ मानला जाणारा चीन आणि मलेशिया या दोन संघांचे आव्हान असणार आहे. भारतीय संघाची मदार प्रामुख्याने एकेरीतील खेळाडू सिंधू, सायना, यांच्यासह पुरुष गटातील किदम्बी श्रीकांत, समीर वर्मा यांच्यावरच राहणार आहे. एकेरीतील हे खेळाडू कामगिरी कशी करतात, त्यावर दुहेरीतील भारताचे आव्हान टिकून राहणार आहे. भारतीय संघाला सोमवारी मलेशियाच्या संघाशी तर मंगळवारी अनेक वेळच्या माजी विजेत्या चीनशी झुंजावे लागणार आहे.

१३ सदस्यीय भारतीय संघाला यंदाच्या स्पर्धेत आठवे मानांकन मिळाले आहे. अद्यापही आजारपणातून तंदुरुस्त न झाल्याने ली चोंग वेई या स्पर्धेत खेळणार नसल्यामुळे मलेशियाचा संघ पुरुष गटात ली झी जिया याच्यावर तर महिला गटात गोह जिन वेई आणि सोनिया चीह यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे भारतीय संघ एकेरीत तरी त्यांच्यापेक्षा वरचढ ठरण्याची शक्यता आहे.

दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्यावर भारताच्या पुरुष दुहेरीची भिस्त असणार आहे. हे दोघे आपल्यावरील जबाबदारी कशी पार पाडतात, यावर बरेच काही अवलंबून असेल. तर चीनविरुद्ध माजी ऑलिम्पिक विजेता चेन लाँग आणि ऑल इंग्लंड विजेता शी युकी तर महिलांमध्ये चेन युफेईचे अत्यंत मोठे आव्हान राहणार आहे. तसेच दुहेरीतही भारतापेक्षा दमदार जोडय़ा असल्याने चीनला रोखणे ही भारतासमोर मोठी डोकेदुखी असणार आहे.