सुग्यार्तोकडून पराभूत झाल्यामुळे उपविजेतेपद
इंडोनेशियाच्या टॉमी सुग्यार्तोविरुद्ध भारताच्या किदम्बी श्रीकांतने तब्बल तीन गेमपर्यंत कडवी झुंज दिली. मात्र अखेरीस श्रीकांतला इंडोनेशियन मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पध्रेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
सुमारे एक तास चाललेल्या या रंगतदार लढतीत श्रीकांतने पहिला गेम २१-१७ जिंकून जेतेपदाची आशा निर्माण केली. मात्र मायदेशात खेळणाऱ्या जागतिक क्रमवारीतील १२व्या स्थानावरील सुग्यार्तोने पुढील दोन गेम अनुक्रमे २१-१३ आणि २४-२२ अशा फरकाने जिंकत जेतेपदावर नाव कोरले.
जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतने चालू हंगामात स्वीस खुली आणि इंडियन सुपर सीरिज स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. सुग्यार्तोविरुद्ध त्याची जय-पराजयाची कामगिरी या सामन्याआधी १-२ अशी होती.
पहिल्या गेममध्ये श्रीकांत-सुग्यार्तो दोघेही परिस्थितीशी जुळवून घेताना झगडताना आढळले. त्यामुळे नेट आणि रेषेजवळ त्यांच्या चुका झाल्या. मात्र क्रॉस कोर्ट स्मॅशचा प्रभावी वापर करत श्रीकांतने ११-८ अशी आघाडी घेतली. मग सुग्यार्तोने त्याचा प्रभावी प्रतिकार करीत १३-१३ अशी बरोबरी साधली. मग अप्रतिम बॅकहँडचे परतीचे फटके आणि स्मॅशेसच्या बळावर श्रीकांतने पुन्हा १७-१३ अशी आघाडी घेतली. मग ती १९-१३ अशी वाढवत नेत पहिला गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये रेषांची चांगली जाणीव ठेवत सुग्यार्तोने ३-१ अशी आघाडी घेतली. मग त्याने ही आघाडी ८-२ अशी वाढवली. श्रीकांत या गेममध्ये फारसा प्रभाव दाखवू शकला नाही.
तिसऱ्या गेममध्ये ७-११ अशा पिछाडीनंतर श्रीकांतने जेतेपदासाठी निकराची लढत दिली आणि २१-२० पर्यंत आघाडी नेली. अखेरीस सुग्यार्तोने तिसऱ्या गेमसह जेतेपदावर नाव कोरले.