तंदुरुस्तीमध्ये शून्य टक्के गुंतवणूक आणि १०० टक्के परतावा असतो. त्यामुळे देशाचे भविष्य हे निरोगी होईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘तंदुरुस्त भारत मोहिमे’ला प्रारंभ करताना व्यक्त केले.

‘‘तंदुरुस्ती हा नेहमीच संस्कृतीचा गाभा असतो. परंतु आता तंदुरुस्तीकडे लोकांचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. दहा वर्षांपूर्वी सामन्य व्यक्ती ८ ते १० किमी अंतर चालत जायची, सायकलिंग करायची किंवा धावायची. तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे शारीरिक कार्ये कमी झाली आहेत. आपण आता कमी चालल्यावर हेच तंत्रज्ञान याची सूचना देऊ लागले आहे,’’ असे मोदी यांनी सांगितले.

‘‘तंदुरुस्ती हा फक्त एक शब्द नाही, तर उत्तम आरोग्याची ती वाट आहे,’’ असे मोदी यांनी सांगितले. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या नेतृत्वाखालील समितीमध्ये २८ सदस्यांचा समावेश आहे.

‘‘तंदुरुस्ती ही काळाची गरज आहे. परंतु तंदुरुस्तीवर चर्चा करण्याऐवजी कार्य करण्याची गरज आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा अनेक जणांना त्रास होत आहे. आता १२ किंवा १५ वर्षांच्या मुलांना मधुमेह आणि ३० वर्षांच्या तरुणाला हृदयविकार हेसुद्धा ऐकिवात आहे. जीवनशैलीवर आधारित हे आजार आपल्याला दूर पळवता येऊ शकतात,’’ असे मोदी यांनी सांगितले.

‘‘बॉक्सिंग, बॅडमिंटन, टेनिस आणि अन्य क्रीडा प्रकारांमध्ये आपले खेळाडू दिमाखदार कामगिरी करीत आहेत. खेळाडूंची पदके ही फक्त त्यांच्या मेहनतीचे फलित नाही, तर त्यातून नव्या भारताचा विश्वास दृढ होत आहे,’’ असे मोदी यांनी सांगितले.