पाचगणी व्यायाम मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेत पुरुषांमध्ये महाराष्ट्र राज्य पोलिसांची मध्य रेल्वेशी गाठ पडणार आहे, तर महिलांमध्ये शिवशक्ती आणि डॉ. शिरोडकर या मुंबईच्या दोन मातब्बर संघांमध्ये जेतेपदासाठी सामना रंगणार आहे.
पुरुषांच्या उपान्त्य लढतीत मध्य रेल्वे आणि आरसीएफ यांच्यात अखेरची पाच मिनिटे बाकी असेपर्यंत चांगलीच रंगत टिकून होती. परंतु आरसीएफवर अखेरच्या क्षणी पडलेला लोण त्यांना महागात पडला आणि मध्य रेल्वेने रोहित पार्टेच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर १६-८ असा हा सामना खिशात घातला.
दुसऱ्या उपान्त्य सामन्यात राज्य पोलिसांनी युनियन बँकेचा १८-१० असा आरामात पराभव केला. पोलिसांकडून अनिल पाटीलने चढायांचा, तर विपुल मोकलने पकडींचा दमदार खेळ दाखवला. तर महेश मोकलने एका चढाईत तीन गुण मिळवले.
महिलांच्या गटात, नेहा कदम आणि क्षितिजा हिरवेच्या पकडींच्या बळावर शिरोडकर संघाने दुसऱ्या सत्रात दोन लोण चढवले आणि अमरहिंदवर २८-१५ अशा फरकाने सहज विजय मिळवला.
दुसऱ्या उपान्त्य सामन्यात राजमाता जिजाऊ संघाने मध्यंतराला घेतलेली ७-५ अशी आघाडी अखेरची तीन मिनिटे बाकी असेपर्यंत १०-९ अशी टिकवली. परंतु शिवशक्ती संघाने अखेरच्या मिनिटांची रणनीती आखूनच आपला खेळ केला होता. रेखा सावंतने प्रथम एक गुण घेत संघाला बरोबरी साधून दिली. मग आणखी एक गुण घेतल्यामुळे राजमाता संघावर लोण पडला. त्यानंतर मात्र शिवशक्तीने १४-१२ असा हा सामना जिंकला.

निरीक्षकांचा एक दिवसाचा धावता दौरा
राज्यात होणाऱ्या कबड्डी स्पध्रेसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनकडून निरीक्षक नेमला जातो. संपूर्ण स्पध्रेचे व्यवस्थापन आणि देखरेख त्याच्या मार्गदर्शनाखाली होते. परंतु पांचगणी राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेच्या निमित्ताने मात्र निरीक्षक संजय अभ्यंकर यांनी मात्र एकदिवसीय धावता दौरा केल्यामुळे या उद्देशालाच तिलांजली मिळाली आहे. पाचगणीत झालेल्या या चारदिवसीय कबड्डी स्पध्रेच्या दुसऱ्या दिवशी अभ्यंकर आले आणि तिसऱ्या दिवशी निघूनही गेले. त्यामुळे निरीक्षकाशिवायच स्पध्रेला प्रारंभ झाला आणि सांगताही झाली. पंचप्रमुख भगवान पवार यांनी मात्र जबाबदारीने ही स्पर्धा पार पाडली.