राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पध्रेच्या महिला गटातील दोन्ही उपांत्य लढती अपेक्षेप्रमाणेच एकतर्फी ठरल्या. त्यामुळे मुंबई उपनगर आणि गतविजेते पुणे यांच्यात विजेतेपदासाठी सामना रंगणार आहे. उपनगरने कोल्हापूरचा ४०-१६ असा पराभव केला, तर उपनगरने रत्नागिरीला ५८-१४ असे आरामात हरवले. पुरुषांमध्ये पुण्याने ठाण्याचा २९-२७ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. सांगली आणि कोल्हापूर यांच्यातील दुसऱ्या उपांत्य लढतीत मात्र पावसाचा व्यत्यय आला.

महिलांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात उपनगरला सुरुवातीला कोल्हापूरने चांगली टक्कर दिली. मात्र काही मिनिटांतच उपनगरने सामन्यावरील नियंत्रण मिळवले. उपनगरने सातव्या मिनिटाला पहिला आणि १२व्या मिनिटाला दुसरा असे दोन लोण चढवून पहिल्या सत्रातच २५-१० अशी आघाडी मिळवली. मग दुसऱ्या सत्रात कोल्हापूरकडून फारसा प्रतिकार झाला नाही.

उपनगरकडून कोमल देवकरने १२ चढायांमध्ये ९ गुण मिळवत विजयात सिंहाचा वाटा उचलला. अभिलाषा म्हात्रे (६ गुण) आणि सायली नागवेकर (४ गुण) यांनी चढायांचे महत्त्वाचे गुण मिळवले. कर्णधार सायली जाधवने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करीत चढायांचे ३ गुण मिळवले, तर पाच दिमाखदार पकडी केल्या. कोल्हापूरकडून अरुणा सावंत आणि पूनम राठोड यांनी छान खेळ केला.

महिलांच्या दुसऱ्या सामन्यात पुण्याने तिसऱ्याच मिनिटाला पहिला लोण चढवून आपल्या वर्चस्वाची चुणूक दाखवली. पहिल्या सत्रात पुण्याने ३२-४ अशी आघाडी घेतली होती. पुण्याने एकंदर चार लोण चढवून सामना सहज जिंकला. पुण्याच्या सायली केरिपाळेने आपल्या अष्टपैलूत्वाचा प्रत्यय घडवला. सायलीने ६ चढायांमध्ये १२ गुण मिळवले आणि सहा यशस्वी  पकडीही केल्या. रत्नागिरीच्या श्रद्धा पवारची झुंज अपयशी ठरली.