करोनामुळे बहीण आणि आई गमावल्यानंतर आपली इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करू नये, अशी विनंती करणाऱ्या वेदा कृष्णमूर्तीची साधी विचारपूसही न केल्याबद्दल ऑस्ट्रेलिया महिला संघाची माजी कर्णधार लिसा स्थळेकरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) टीका केली आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीला बहीण वत्सलाचा मृत्यू झाल्याच्या दोन आठवडय़ांनंतर वेदाच्या आईचेही निधन झाले. त्यानंतर पुढील महिन्यात होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी वेदाची नवड करण्यात आली नाही. मात्र ‘बीसीसीआय’ने हे प्रकरण नीट हाताळले नाही, अशी टीका स्थळेकरने केली आहे.

‘‘वेदाची ‘बीसीसीआय’ने साधी विचारपूसही केली नाही, याचा मला सर्वात जास्त राग आला. हा आघात ती कसा सहन करतेय, याचीही पर्वा त्यांना नाही. संघटना फक्त खेळाचा नव्हे तर खेळाडूचाही सर्वार्थाने विचार करते. त्यामुळे मी निराश आहे,’’ असे स्थळेकरने म्हटले आहे.

गोस्वामीकडूनही टीका

बंगालचा यष्टीरक्षक-फलंदाज श्रीवत्स गोस्वामीने स्थळेकरच्या मतांशी सहमती दर्शवली. ‘‘देशांतर्गत क्रिकेटमधील परिस्थिती वाईट आहे. खेळाडूंचे मानसिक आरोग्य तसेच त्यांच्याशी संवाद साधून भविष्याविषयी मार्गदर्शन करणे, अशा गोष्टींचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. राज्य संघटनांना क्रिकेटपटूंविषयी काहीही घेणेदेणे नाही,’’ अशी टीका गोस्वामीने केली आहे.