एएफसी आशियाई चषक पात्रता सामन्यासाठी भारताचा ३२ खेळाडूंचा चमू जाहीर

अनुभवी गोलरक्षक सुब्रात पॉलला भारताच्या फुटबॉल संघासाठीच्या संभाव्य खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. एएफसी आशियाई चषक स्पर्धेच्या पात्रता सामन्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) शुक्रवारी संभाव्य ३२ खेळाडूंची नावे जाहीर केली. किर्गीज प्रजासत्ताक विरुद्ध होणाऱ्या लढतीसाठीच्या या संभाव्य संघातून सुब्रातची गच्छंती करण्यात आली आहे.

नेहरू चषक आणि एएफसी चॅलेंज चषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य असलेल्या ३१ वर्षीय सुब्राताकडे मुख्य प्रशिक्षक स्टीफनन कॉन्स्टनटाईन यांनी दुर्लक्ष केले. सुब्राताच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर भारताने २७ वर्षांनी आशियाई चषक स्पर्धेची पात्रता मिळवली होती.

सुब्राताला गतवर्षी राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेकडून (नाडा) तात्पुरत्या निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. मात्र नंतर केवळ ताकीद देऊन सुब्रातावरील बंदी उठवण्यात आली.

विशेष म्हणजे लाल कार्ड मिळाल्यामुळे भारताचा कर्णधार सुनील छेत्रीचीही संभाव्य संघात निवड करण्यात आलेली नाही. या संभाव्य खेळाडूंचे शिबीर मुंबईत भरवण्यात आले असून त्यातून २७ मार्चला बिश्केक येथे होणाऱ्या लढतीसाठी अंतिम संघ निवडण्यात येईल.

भारताचा संभाव्य संघ

गोलरक्षक : गुरप्रीतसिंग संधू, विशाल कैथ, अमरिंदर सिंग, रेनेश टीपी.

बचावपटू : प्रीतम कोटल, निशू कुमार, लालरुथारा, अनास इडाथोडीका, संदेश झिंगन, सलाम रंजन सिंग, सार्थक गोलुई, जेरी लालरीझुआला, नारायण दस, सुभाशिष बोस

मध्यरक्षक : जॅकीचंद सिंग, उदांता सिंग, सेईत्यसेन सिंग, धनपाल गणेश, अनिरुद्ध थापा, गेरमानप्रीत सिंग, रॉवलिन बोर्गेस, मोहम्मद रफी, केव्हीन लोबो, बिकास जैरू, हलिचरण नाझरी

आघाडीपटू : हितेश शर्मा, बलवंत सिंग, जेजे लाल्पेखलुआ, सेमिनलेन डौंगल, अ‍ॅलेर डेओरी, मनवीर सिंग, सुमीत पास्सी.