एका मूत्रपिंडाद्वारे आपण २००३च्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक पटकावून अन्य स्पर्धामध्येही यश संपादन केले, असा गौप्यस्फोट ऑलिम्पियन लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज हिने केला आहे.

‘‘अडथळ्यांवर मात करत, अनेक मर्यादा असतानाही वेदनाशामक गोळ्या घेऊन मी हे यश मिळवले. जागतिक स्पर्धेत एका मूत्रपिंडाद्वारे भाग घेणारी कदाचित मी पहिली खेळाडू असेन. माझी गुणवत्ता किंवा प्रशिक्षकांची जादू असे या यशाचे वर्णन करता येईल,’’ असेही अंजू म्हणाली.

अंजू हिने आपला पती रॉबर्ट बॉबी जॉर्ज यांच्या प्रशिक्षकपदाखाली हे यश मिळवले. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, ‘‘अंजूने आपली जिद्द, प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर देशाचे नाव उंचावले. जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारी ती देशातील एकमेव खेळाडू ठरली आहे.’’