सध्याच्या घडीला भारतीय संघाची टॉप ऑर्डर ( पहिले तीन फलंदाज) जगात कोणत्याही संघाला हेवा वाटायला लावणारी आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी भारताची सलामीची जोडी आणि त्यानंतर मैदानात उतरणारा रनमशीन विराट कोहली यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. ‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शिखर धवन संघात नव्हता. मात्र, अजिंक्य रहाणेने त्याची उणीव भासू दिली नाही. विराट कोहली त्याच्या नेहमीच्या फॉर्मात नसला, तरीही तो सध्याच्या घडीचा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्यामुळेच भारताचे सुरुवातीचे तीन फलंदाज दृष्ट लागण्यासारखे आहेत,’ अशा शब्दांमध्ये गावसकर यांनी भारतीय फलंदाजांचे कौतुक केले.

‘शिखर धवनच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने रोहित शर्माच्या साथीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला. विराट कोहलीला यंदाच्या मालिकेत त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मात्र, तरीही तो सध्याच्या घडीचा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. धवन-रोहित असो वा रहाणे-रोहित आणि त्यानंतर येणारा कोहली, ही भारतीय फलंदाजी संपूर्ण जगाला हेवा वाटावा अशीच आहे,’ असेदेखील त्यांनी म्हटले.

भारतीय संघाने पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर सफाईदार विजय मिळवत एकदिवसीय मालिका ४-१ अशी जिंकली. पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला २४३ धावांचे लक्ष्य दिले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित आणि रहाणे या दोन मुंबईकर फलंदाजांनी भारताला १२४ धावांची सलामी दिली. विशेष म्हणजे सलग तिसऱ्या सामन्यात त्यांनी संघाला शतकी सलामी दिली. रोहितने या मालिकेत ५९.२० च्या सरासरीने २९६ धावा केल्या. तर रहाणेने ४८.८० च्या सरासरीने २४४ धावा फटकावल्या.

याआधी श्रीलंकेच्या विरुद्धच्या मालिकेतही भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांनी दमदार कामगिरी केली होती. या मालिकेत कोहलीने सर्वाधिक धावा केल्या होत्या. या मालिकेतील कोहलीची सरासरी ११० इतकी होती. तर रोहित शर्माने ७५.५० च्या सरासरीने ३०२ धावा केल्या होत्या. शिखर धवन या मालिकेतील शेवटच्या सामन्याला मुकला होता. मात्र, त्यानेही या मालिकेत ६३.३३ च्या सरासरीने १९० धावा केल्या होत्या.