चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सवर १४ धावांनी मात केली. कोलकाताने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. चेन्नईने कोलकातासमोर २०० धावांचा डोंगर उभा करुन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा ठरवला. त्यानंतर २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता संघाची सुरूवात बरी झाली. पण चेन्नईच्या सुरूवातीसारखी फलंदाजी कोलकाताच्या फलंदजांना करता आली नाही. त्यात संघाचा कर्णधार गंभीर बाद झाल्यानंतर धावसंख्येला ब्रेक लागला होता.  कॅलिसच्या फलंदाजीमुळे कोलकाता २०० धावांचा टप्पा गाठेल असे वाटत असतानाच. कॅलिसही तंबूत परतला. मॉरगन आणि युसूफ पठाणने अखेरच्या षटकापर्यंत झुंझ सुरू ठेवली. परंतु सामन्याच्या अखेरीस चेन्नईने १४ धावांनी विजय मिळविला.

सामन्याच्या पहिल्या षटकापासून पावर प्लेचा योग्य फायदा उचलत चेन्नईने धडाकेबाज फलंदाजीला सुरूवात केली. चेन्नई संघाचा ‘मिस्टर क्रिकेटर’ मायकल हसीने तुफानी फलंदाजी करत पहिल्या पाच षटकांमध्येच संघाच्या धावसंख्येने पन्नासचा आकडा पार केला. मायकल हसीची ताबडतोड फलंदाजी बघता आयपीएलच्या या पर्वातले दुसरे शतक मायकल हसी ठोकणार असे दिसत असतानाच, कोलकाताचा फिरकी गोलंदाज सुनील नरेनने मायकल हसीला ९५ धावांवर बाद केले. त्यानंतर सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संघाच्या धावसंख्येचा चढता आलेख कायम राखत वीस षटकांच्या सरतेशेवटी २०० धावांचा टप्पा गाठला होता.