९० च्या दशकात प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीसाठी सचिन तेंडुलकर हा दैवत होता. मैदानात प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई करताना सचिनला पाहणं हे महत्वाचं मानलं जायचं. अनेक क्रिकेट प्रेमी जुन्या काळात सचिनची फलंदाजी पाहण्यासाठी टिव्हीसमोर किंवा रेडीओवर कॉमेंट्री ऐकण्यासाठी समोर बसून असायचे. भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानेही शाळेत असताना सचिनची शारजामधली फलंदाजी पाहण्यासाठी शाळेला दांडी मारली होती. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत सुरेश रैनाने जुन्या आठवणी जागवल्या.

शारजामध्ये भारतीय संघ कोको कोला कप खेळत होता. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं आव्हान होतं. “आमच्या घरात टिव्ही होता, पण त्यावेळी त्यावर फक्त दूरदर्शन ही वाहिनी लागायची. मी त्यावेळी शाळेत होतो आणि मला माझ्या मित्राने विचारलं सचिनची बॅटिंग पहायची आहे का?? तर त्यावेळी मी शेवटचे दोन तास दांडी मारुन सुनिल नावाच्या आमच्या मित्राच्या घरी सामना पहायला गेलो होतो. त्यावेळी फक्त त्याच्याकडे केबल टिव्ही होता, त्यामुळे क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी त्याच्याकडे गर्दी झालेली असायची. मी आणि माझे ५-६ मित्र सचिनची बॅटिंग पहायला गेलो होतो. त्यावेळी आमचा अजुन एक मित्र जमिलने सर्वांसाठी खाण्याची व्यवस्था केली होती.” रैना सचिनची फलंदाजी पाहण्यासाठी बालपणी केलेल्या सर्व कारनाम्यांबद्दल बोलत होता.

सचिन त्यावेळी सलामीला फलंदाजीसाठी यायचा, आणि त्याची फलंदाजी पाहण्यासाठी आम्ही काहीही करायचो. सचिन आऊट झाला की मात्र आम्ही सर्व निघून जायचो. मी त्यावेळी प्रचंड लहान होतो, कदाचीत सातवीत शिकत होतो आणि सचिन तेंडुलकर हे नावच आमच्यासाठी मोठं होतं. शारजामध्ये सचिन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करतोय आणि टोनी ग्रेग यांची कॉमेंट्री या सर्व गोष्टी आम्हाला खूप भारी वाटायच्या, रैना जुन्या आठवणींबद्दल बोलत होता. शारजामध्ये झालेल्या सामन्यात सचिनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची केलेली धुलाई आजही क्रिकेट प्रेमींच्या मनात कायम आहे. अंतिम सामन्यात सचिनने १३१ चेंडूत १३४ धावांची बहारदार खेळी केली होती. त्यावेळी प्रसारमाध्यांनी सचिनच्या या खेळीला DESERT STORM असं नाव दिलं होतं. अंतिम सामन्यातील या खेळीसाठी सचिनला सामनावीराचा किताबही मिळाला होता.