एकमेकांशीच स्पर्धा टाळण्यासाठी भारताचा ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता सुशील कुमार आणि कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त यांनी आगामी रिओ ऑलिम्पिकमधील कुस्ती खेळात अनुक्रमे ७४ व ६८ किलो गटात सहभागी होण्याचे निश्चित केले आहे.
सुशीलने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य तर लंडन ऑलिम्पिकमध्ये ६६ किलो गटात रौप्यपदक मिळविले आहे. योगेश्वरने लंडन ऑलिम्पिकमध्ये ६० किलो गटात कांस्यपदक पटकाविले आहे. आगामी ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरने ६६ किलो गटात भाग घेण्याचे ठरविले होते. त्यामुळे सुशील व तो एकाच गटात येण्याची शक्यता होती. ही शक्यता टाळण्यासाठी सुशीलने वरच्या वजनी गटात भाग घेण्याचे ठरविले आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुशील ७० किलो गटात तर योगेश्वर हा ६५ किलो गटात सहभागी होणार आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये नुकतीच या विषयाबाबत चर्चा झाली व त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला, असे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक विनोद कुमार यांनी सांगितले.  
लंडन ऑलिम्पिकनंतर हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी झाले नव्हते. ते आता कोलोरॅडो स्प्रिंग्ज स्पर्धेत सहभागी होणार आहेत. लंडन ऑलिम्पिकनंतर त्यांची ही पहिलीच स्पर्धा आहे.
जागतिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारा अमितकुमार दहिया हा ऑलिम्पिक स्पर्धेत ५७ किलो गटात सहभागी होणार आहे. जागतिक स्पर्धेतून ५५ किलो गट काढून टाकण्यात आला आहे. तो डेव्ह शूट्झ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ५७ किलो गटात आपले नशीब आजमावणार आहे. जागतिक कांस्यपदक विजेता बजरंग हा आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये ६१ किलो गटात सहभागी होणार आहे. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता नरसिंग यादव हा ७४ किलोऐवजी ८६ किलो गटात सहभागी होईल. ‘रुस्तुम ए हिंद’ स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणारा सत्यव्रत ९६ किलो गटात लढणार आहे.
सुशीलचे सासरे नाराज!
खेळाडूंच्या वजनी गटातील बदलाबाबत सुशील कुमारचे सासरे व महाबली सतपाल यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. सुशीलने वजन कमी करून ६५ किलो गटात सहभागी व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. परंतु बदल स्वीकारून सुशीलने नवीन आव्हानाला सामोरे जावे, असेही त्यांनी सुचविले.