14 November 2019

News Flash

Asian Games 2018 : स्वप्ना बर्मनच्या सुवर्णपदक विजयात राहुल द्रविडचे असेही योगदान

राहुल क्रिकेटच्याच बरोबरीने अन्य खेळांमध्येही सक्रीय आहेत. हे फार कमी जणांना माहिती असेल. गो स्पोटर्स सोबत काम करणाऱ्या राहुल द्रविड यांनी खेळाडूंसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाची रचना केली

सौजन्य - टाइम्स नाऊ

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही राहुल द्रविड आपल्यापरीने भारतीय क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण योगदान देत आहेत. राहुल यांनी भारतीय क्रिकेटपटूंची पुढची पिढी घडवण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. पृथ्वी शॉ, हार्दिक पांडया आणि असे अनेक प्रतिभावान युवा खेळाडू त्यांच्या तालिमीत तयार झाले आहेत . राहुल क्रिकेटच्याच बरोबरीने अन्य खेळांमध्येही सक्रीय आहेत. हे फार कमी जणांना माहिती असेल.

दत्तू भोकनाळ, पी.साई प्रणीथ, किंदबी श्रीकांत आणि हेप्टॉथ्लॉनमध्ये नुकतचं सुवर्णपदक जिंकणाऱ्या स्वप्ना बर्मन या युवा खेळाडूंना त्यांनी मोलाची मदत केली आहे. राहुल द्रविड हे गो स्पोटर्स फाऊंडेशनशी जोडलेले आहेत. याच गो स्पोटर्स फाऊंडेशनने २०१७-१८ मध्ये देशभरातून एकूण २० खेळाडूंची निवड केली. गो स्पोटर्सने निवडलेल्या खेळाडूंना २०१८ आशियाई स्पर्धा आणि २०२० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आर्थिक आणि अन्य स्वरुपाची मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

गो स्पोटर्स सोबत काम करणाऱ्या राहुल द्रविड यांनी खेळाडूंसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाची रचना केली होती. द्रविड यांनी आखलेल्या या मार्गदर्शन कार्यक्रमाचा स्वप्नाला भरपूर फायदा झाला. तिच्या या सुवर्णपदक विजयात राहुल द्रविड यांचेही योगदान आहे.  स्वप्नाने आशियाई स्पर्धेत हेप्टॉथ्लॉनमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वप्नाला १० लाख रुपयांचे इनाम जाहीर केले असून सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे.

कसा असतो हेप्टॉथ्लॉनचा खेळ
पश्चिम बंगलाच्या जलपायगुरी जिल्ह्यातून आलेल्या या मुलीने देशाचे नाव उज्वल केले आहे. स्वप्नाच्या सुवर्णपदक विजेत्या कामगिरीमुळे आज हेप्टॉथ्लॉन या खेळाचे नाव अनेकांना समजले असेल. हेप्टॉथ्लॉनमध्ये एकूण सात खेळांचा समावेश होतो. तिने दोन दिवसात ६०२६ गुणांची कमाई करुन सुवर्णपदकाला गवसणी घातली. पात्रता फेरीमधील पहिल्या दोन (भालाफेक आणि उडी) निकषांमध्ये मोठी आघाडी घेत पहिले स्थान कायम राखल्यानंतर स्वप्नाने ८०० मीटरची शर्यत पूर्ण करून सुवर्णपदकावर नाव कोरले. हेप्टॉथ्लॉन या खेळात अॅथलेटीक्सच्या सात प्रकारांचा समावेश असतो. यामध्ये २०० मी. आणि ८०० मी. धावण्याची शर्यत होते. त्याचबरोबर १०० मी. अडथळ्याची शर्यत खेळवली जाते. त्यानंतर उंच उडी. लांब उडी, गोळाफेक आणि भालाफेक या प्रकारांचा समावेश असतो.

First Published on August 31, 2018 3:07 am

Web Title: swapna barmans heptathlon gold medal rahul dravid