मुंबईच्या आकांक्षा व्होरा व नील रॉय यांनी प्रत्येकी दोन शर्यतींमध्ये विक्रम नोंदवीत सुवर्णपदक मिळविले आणि कनिष्ठ गटाच्या राज्य जलतरण स्पर्धेत पहिला दिवस गाजविला.
शिवछत्रपती क्रीडानगरीत शुक्रवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत आकांक्षा हिने १७ वर्षांखालील गटात २०० मीटर फ्रीस्टाइल शर्यत २ मिनिटे ९.४४ सेकंदांत जिंकली आणि मोनिक गांधीने दोन वर्षांपूर्वी नोंदविलेला २ मिनिटे ११.७६ सेकंद हा विक्रम मोडला. तिने १५०० मीटर फ्रीस्टाइल शर्यतही १८ मिनिटे ४.५० सेकंदांत जिंकून सोनेरी कामगिरी केली. तिने सुरभि टिपरेचा पाच वर्षांपूर्वीचा १८ मिनिटे ३८.०५ सेकंद हा विक्रम मोडला.
नीलने १४ वर्षांखालील गटात २०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत सुवर्णपदक मिळविताना २ मिनिटे २२.१२ सेकंद वेळ नोंदविली आणि वेदांत रावने २०११ मध्ये नोंदविलेला २ मिनिटे २९.४६ सेकंद हा विक्रम मोडला. नीलने १०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत एक मिनीट १.७० सेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवीत सुवर्णपदक मिळविले. त्याने नचिकेत बुझरुक याचा गतवर्षी नोंदविण्यात आलेला एक मिनीट २.२४ सेकंद हा विक्रम मोडला.
मुलींच्या १४ वर्षांखालील गटात मुंबईच्याच सई पाटीलने १०० मीटर बटरफ्लाय शर्यत एक मिनीट १०.८४ सेकंद या विक्रमी वेळेत जिंकली व ऋजुता भटने २००८ मध्ये नोंदवलेला एक मिनीट ११.३३ सेकंद हा विक्रम मोडला. तिने शंभर मीटर फ्रीस्टाईल शर्यतीचेही सुवर्णपदक जिंकले. याच वयोगटात मुंबईच्याच रायना सलढाणाने २०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत २ मिनिटे १४.२२ सेकंदांत जिंकली आणि मोनिक गांधीचा तीन वर्षांपूर्वीचा २ मिनिटे १७.३७ सेकंद हा विक्रम मोडला. तिने ८०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत सुवर्णपदक जिंकून दुहेरी मुकुट पटकाविला.  मुलांच्या १७ वर्षांखालील गटात मुंबईच्या ईशान जाफरने २०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत एक मिनीट ५७.९७ सेकंदात जिंकताना स्वत: गतवर्षी नोंदविलेला २ मिनिटे १.३० सेकंद हा विक्रम मोडला. पुण्याच्या युक्ता वखारियाने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीचे विजेतेपद मिळविले, तर सिद्धी कारखानीसने १०० मीटर बटरफ्लाय शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले.