दक्षिण आफ्रिकेत २००७ साली पार पडलेला टी-२० विश्वचषक हा सर्व भारतीय क्रीडा प्रेमींच्या चांगलाच स्मरणात आहे. २४ सप्टेंबर २००७, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुलनेत नव्याने जन्माला आलेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान ही दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी समोरासमोर आले होते. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या मैदानावर पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल-हक मैदानावर तळ ठोकून भारताचा विजयाचा घास हिरावण्याच्या तयारीत होता. अखेरच्या षटकात विजयासाठी अवघ्या ६ धावांची गरज असताना मिसबाहने जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर यष्टींमागे फटका खेळण्याचा प्रयत्न केला, आणि श्रीशांतच्या हातात चेंडू जाऊन बसल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच जल्लोष झाला. भारताच्या पहिल्या टी-२० विश्वचषकाला आज १३ वर्ष पूर्ण झाली आहेत

गंभीरची मॅच विनिंग खेळी-
पाकिस्तानविरोधात झालेल्या अंतिम सामन्यात गंभीरने दमदार खेळी केली. भारतीय संघाने 20 ओव्हर्समध्ये पाच विकेट गमावत 157 धावा केल्या होत्या. गंभीरने 54 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 75 धावा केल्या होत्या. पाकिस्तान संघ 19.3 ओव्हरमध्येच ऑल आऊट झाला आणि भारताने टी-20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.

इंग्लंडविरोधात युवाराजचे सहा षटकार –
पहिल्यावहिल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत युवराजने सहा चेंडूवर सहा षटकार लगावायचा कारनामा केला होता. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवराज मैदानावर आला, तेव्हा अँड्र्यू फ्लिंटॉफ याने त्याला डिवचले, त्यानंतर पुढच्याच षटकात युवराजने स्टुअर्ट ब्रॉड या गोलंदाजाच्या षटकात ‘त्या’ डिवचण्याचा हिशेब चुकता केला आणि ६ चेंडूंवर ६ षटकार लगावले. त्या सामन्यात त्याने १२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. ती खेळी त्यावेळी विक्रमी ठरली होती.

अंतिम सामन्यातील मिसबाहाचा तो फटका-
२००७ सालचा टी२० विश्वचषक.. पाकिस्तानला चार चेंडूत विजयासाठी ६ धावांची गरज.. आणि त्या वेळी पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हक याने फाईन लेगच्या दिशेने मारलेला स्कूपचा फटका. चेंडू आकाशात उंच गेला आणि क्षेत्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या श्रीशांतने झेल टिपत पहिल्यावहिल्या टी२० विश्वचषकावर भारताचे नाव कोरले. त्या फटक्यामुळे पाकिस्तान सामना आणि विश्वचषक हरला.

गोलंदाजांची भूमिका –
इरफान पठाण, आर.पी सिंह, श्रीशांत, आणि जोगिंदर शर्मा यांच्या वेगवान माऱ्यापुढे अनेक दिग्गज फलंदाजांनी नांग्या टाकल्या. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघातील दिग्गज खेळाडूंना या नवख्या गोलंदाजांनी लवकर बाद केले. विश्वचषक स्पर्धेत भारतीय वेगवान आणि फिरकी माऱ्यापुढे दिग्गज फलंदाजांना नांग्या टाकाव्या लागल्या. पहिल्या विश्वचषक विजयात वेगवान गोलंदाजांचाही महत्वाचा वाटा होता.

फिरकीची कमाल –
हरभजन सिंह, पियूष चावला आणि युवराज सिंह यांच्या दर्जेदार फिरकी गोलंदाजांनी भारताला मोक्याच्या क्षणी बळी मिळवून दिले. तसेच समोरच्या फलंदाजांना मोठे फटके मारु दिले नाहीत.