आठवडय़ाची मुलाखत : मधुरिका पाटकर (राष्ट्रीय विजेती टेबल टेनिसपटू)

अंतिम लढतीत खेळताना अनेक वर्षांच्या आठवणी दाटून आल्या होत्या. त्यांना काबूत ठेवले. याचबरोबरीने वजन कमी करण्यासाठी आहार नियंत्रणात आणला. २९व्या वर्षी राष्ट्रीय जेतेपदाचे स्वप्न साकार करणाऱ्या महाराष्ट्राच्या मधुरिका पाटकरने यशाचा गुरुमंत्र ‘लोकसत्ता’शी बोलताना उलगडला. वीस वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पदके मिळवून देणाऱ्या मधुरिकाने राष्ट्रीय जेतेपदासाठीची मेहनत, शिक्षणाचे महत्त्व अशा विविध मुद्दय़ांवर ‘लोकसत्ता’शी केलेली बातचीत.

* २००८ मध्ये तू कनिष्ठ गटाचे राष्ट्रीय जेतेपद पटकावले होतेस. तब्बल नऊ वर्षांनंतर राष्ट्रीय जेतेपद पटकावलेस. अपेक्षांचे ओझे उतरले?

राष्ट्रीय स्पर्धामध्ये मी सातत्याने खेळत होते, मात्र जेतेपद हुलकावणी देत होते. यादरम्यान राष्ट्रकुल, दक्षिण आशियाई स्पर्धा अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदक पटकावले. परंतु देशातील सर्वोत्तम स्पर्धेचे जेतेपद नावावर नसल्याची खंत होती. यंदाच्या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मी पराभवाच्या उंबरठय़ावर होते. तिथून जेतेपदापर्यंत पुनरागमन केले. अंतिम फेरीत पौलमी घटकसारखी सहा राष्ट्रीय जेतेपदे नावावर असलेली तुल्यबळ खेळाडू समोर होती. अंतिम लढत खेळताना मनात खूप साऱ्या आठवणींनी गर्दी केली. भावनांवर नियंत्रणात ठेवत पौलमीला नमवत जेतेपद पटकावू शकले आणि एक वर्तुळ पूर्ण झाले. अपेक्षांच्या ओझ्यापेक्षा स्वत:च्या क्षमतेला न्याय देऊ शकले याचा आनंद विलक्षण आहे.

* पश्चिम बंगाल टेबल टेनिसपटूंचे माहेरघर समजले जाते. अन्य राज्यांतले खेळाडूही तुल्यबळ आहेत. इतक्या वर्षांचे राष्ट्रीय जेतेपदाचे स्वप्न साकारण्यासाठी काय वेगळे केलेस?

तंत्रकौशल्य या मुद्दय़ावर अडचण नव्हती, पण वजनामुळे हालचालींवर मर्यादा येत असल्याचे लक्षात आले. तसंच दडपणाच्या क्षणी मानसिक कणखरता कमी पडत असल्याने चुका घडत असल्याचे स्पष्ट झाले. आहारतज्ज्ञ डॉ. नितीन पाटणकर आणि फिजिओ किशोर पुजारी यांनी शिस्तबद्ध कार्यक्रमच आखला. मार्च ते मे या तीन महिन्यांत वजन ५६वर आणण्यासाठी कठोर परिश्रम केले. पावभाजी, डोसा असे फास्टफूड आणि भात मला खूप आवडतो. ते सगळे खाण्यावर बंदी आली. अंडय़ाची भुर्जी ही न्याहरी, ग्रीन टी, ज्वारी-नाचणी-ओट्सची भाकरी हा आहार झाला. चॉकलेट्सपासूनही स्वत:ला परावृत्त केले. वजन कमी झाल्याने शरीर हलके झाले, हालचाली वेगवान झाल्या. लहानपणापासून ठाण्यातील बुस्टर अकादमीच्या शैलजा गोहाड यांच्याकडे मी खेळाचे प्रशिक्षण घेते आहे. खेळातले बारकावे पक्के करण्यासाठी १० ते १२, २ ते ४ आणि ७ ते ९ असे सराव सत्र त्यांनी आखले. एका वेळी अनेक खेळाडूंविरुद्ध खेळण्याच्या पद्धतीवर त्यांनी भर दिला. कारकीर्दीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. याबरोबरीने ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या सत्रांचा उपयोग झाला. अकादमीत योग आणि मानसिक बळकटतेसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते. राष्ट्रीय जेतेपद म्हणजे या सगळ्या प्रयत्नांची फलश्रुती आहे.

* लग्नानंतर कारकीर्द थांबते असा अनेक महिला क्रीडापटूंचा अनुभव आहे. तुझ्या बाबतीत नेमके उलटे घडले आहे?

ओंकार (तारगोळकर) आणि माझे लग्न गेल्याच वर्षी झाले. तो स्वत: राष्ट्रीय दर्जाचा टेबल टेनिसपटू आहे. लग्न झाल्यानंतर मी ठाण्याहून मुलुंडला आले, परंतु माझ्या आई-वडिलांप्रमाणे ओंकार आणि त्याच्या घरच्यांचा पाठिंबा असल्याने ही वाटचाल शक्य झाली. स्वत: खेळाडू असल्याने खेळ कसा सुधारता येईल यावर आम्ही सातत्याने चर्चा करतो. बहुतांशी स्पर्धाना तो स्वत: उपस्थित असतो. लग्नानंतर कारकीर्द आणखी बहरली असेच म्हणणे योग्य ठरेल.

* तुझी कारकीर्द वीस वर्षांहून अधिक विस्तारली आहे. टेबल टेनिस हा चपळतेची परीक्षा बघणारा खेळ आहे. इतकी वर्षे खेळत राहू शकण्यामागची प्रेरणा काय?

हा खेळ मला प्रचंड आवडतो. हे मूळ कारण. जिंकणे-हरणे हा खेळाचा भाग झाला, परंतु संघर्ष न करता गोष्टी अर्धवट सोडायच्या नाहीत ही वडिलांची शिकवण. हे तत्त्व मी कसोशीने जपले. आमच्या घरात कोणीच खेळांशी संलग्न नाही. माझ्यापासूनच सुरुवात झाली. मेहनत करूनच यश मिळवायला हवे यावर आई-बाबांनी सदैव भर दिला. टेबल टेनिसपटू ‘ब्रॅण्ड’ झालेले नाहीत. माझ्या यशाने नव्या खेळाडूंना एक उदाहरण निर्माण व्हावं. खेळाला लोकप्रिय करण्यात माझे योगदान असावे ही इच्छाच प्रेरणाच आहे.

* सबज्युनियर, कनिष्ठ पातळीवर राज्याचे खेळाडू मोठय़ा प्रमाणावर चमकताना दिसतात मात्र अभ्यासाच्या दडपणामुळे शालेय शिक्षणानंतर हे प्रमाण एकदम घसरते. टेबल टेनिसइतकेच तू अभ्यासातही अग्रेसर आहेस. त्याबद्दल काय सांगशील?

शिक्षणामुळे खेळाडूंचे प्रमाण कमी होते हे सत्य आहे. मला दहावीला ८२ टक्के होते. डॉक्टर व्हावे अशी आईची इच्छा होती, परंतु मी वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला. माझ्या निर्णयाला आई-बाबांनी पाठिंबा दिला. बीकॉमनंतर एमकॉमही केले. ‘ह्य़ूमन रिसोर्स’ विषयात डिप्लोमाही केला. खेळाडू घडणे खडतर आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. बाकी पर्याय स्वीकारले तर आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. खेळांच्या बाबतीत ती खात्री नाही त्यामुळे पालकांची भूमिकाही चुकीची नाही. खेळाची आवड जोपासावी मात्र ठरावीक शिक्षण पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.

* देशांतर्गत पातळीवर चांगले प्रदर्शन करणारे आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर पिछाडीवर का जातात?

आपल्याकडे अकादमी मोजक्या आहेत. चीनसारख्या देशात शालेय वयोगट पातळीवर हजारो खेळाडू खेळतात. त्यांना मार्गदर्शनासाठी तेवढय़ाच संख्येत प्रशिक्षकांची फौज असते. भारतात आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे आयोजनही दुर्मीळ आहे.

दिल्लीत होणार असलेल्या ‘इंडिया ओपन’ स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना उत्तम व्यासपीठ मिळेल. चाहत्यांचा पाठिंबा मिळेल. टीव्हीवर आपले खेळाडू दिसतील. जेणेकरून चाहत्यांपर्यंत खेळाचा प्रसार होण्यास मदत होईल. अशा स्पर्धाची वारंवारता वाढायला हवी.