करोनामुळे लागू असलेल्या देशव्यापी टाळेबंदीच्या दिवसांत पुण्याच्या सैनिकी क्रीडा संस्थेत असलेला तिरंदाज तरुणदीप राय खांद्यांचे स्नायू बळकट करण्यासाठी शारीरिक तंदुरुस्तीत व्यग्र आहे. वर्षभर लांबणीवर पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिकसाठी स्वत:ला सज्ज करण्याचा हा प्रयत्न असल्याचे तरुणदीपने सांगितले.

‘‘ऑलिम्पिक एक वर्ष लांबणीवर पडल्याने माझे वयही वर्षांने वाढणार आहे. त्यामुळे ते आणखी एक आव्हान असेल,’’ असे कारकीर्दीतील तिसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयार होणाऱ्या ३६ वर्षीय तरुणदीपने सांगितले. तो २००४च्या अ‍ॅथेन्स आणि २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता. ‘‘सध्याच्या टाळेबंदीमुळे दैनंदिन सरावात बदल करावा लागला आहे. सध्या यू-टय़ुबवर पाहून खांद्यांना बळकटी आणण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे व्यायामशाळेत मी बराच वेळ घालवतो,’’ असे तरुणदीपने सांगितले.