टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे ३ सामन्याची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. या सामन्यात कोहलीने शानदार शतक (१०४) ठोकले आणि विजयात मोठा वाटा उचलला. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऐतिहासिक यश प्राप्त केले. त्यामुळे तो उत्तम कर्णधार असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. याबाबत बोलताना त्याने आपल्या उत्तम कर्णधार बनण्याच्या यशाचे श्रेय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना दिले. शास्त्री यांनी माझ्या खेळात मला कधीही बदल करण्यास भाग पाडले नाही, म्हणून मी कर्णधार म्हणून यशस्वी ठरत आहे, असे तो म्हणाला.

‘शास्त्री यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. त्यांनी समालोचकाची भूमिकाही बजावली आहे. त्यामुळे त्यांनी अनेक सामने पाहिले आहेत. सामन्याच्या परिस्थितीनुसार कसा खेळ करावा हे त्यांना योग्यपणे माहिती आहे. त्यामुळे ते आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करतात. पण ते कधीही एखाद्या खेळाडूच्या शैलीत हास्तक्षेप करत नाहीत किंवा एखाद्याला आपली खेळी बदलण्यासाठी कधीही भाग पाडत नाहीत. त्यामळे सर्व खेळाडू नैसर्गिक खेळ करतात आणि त्यामुळेच टीम इंडिया यशस्वी होत आहे, असे तो म्हणाला.

दरम्यान, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार कोहलीने वन-डे कारकिर्दीतील ३९वे शतक झळकावले. त्याने सचिन तेंडुलकरपेक्षा कमी डावात ही कामगिरी केली. या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही नाबाद ५५ धावांची खेळी करून त्याला चांगली साथ दिली.