श्रीलंका दौरयावर असलेल्या भारतीय संघाने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शनिवारी सकाळी ध्वजारोहण केले. भारत आणि श्रीलंकादरम्यान गॉल येथे सध्या पहिला कसोटी सामना सुरू आहे. सामन्याचा आजच्या दिवसाचा खेळ सुरू होण्यासाठी सकाळी भारतीय संघाने ध्वजारोहण केले. यावेळी संपूर्ण संघ आणि संघाशी निगडीत संपूर्ण व्यवस्थापन मंडळ उपस्थित होते. भारतीय खेळाडूंनी राष्ट्रगीताचे समूह गायन करीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांनी ध्वजारोहण केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) यासंबंधिची छायाचित्रे शेअर केली आहेत.
दरम्यान, गॉल कसोटीत भारतीय संघासमोर विजयासाठी १७६ धावांचे आव्हान यजमानांनी ठेवले आहे. हे आव्हान भारतीय संघ सहजरित्या गाठून स्वातंत्र्यदिनी भारतीय संघ देशवासियांना कसोटी विजयाची भेट देण्यास उत्सुक आहे. त्यामुळे आजच्या खेळावर साऱयांचे लक्ष असणार आहे.