भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला. दुसऱ्या सामन्यात हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेने संघाला दमदार विजय मिळवून दिला. त्यानंतर टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी आणखी गोड बातमी आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याला कन्यारत्नप्राप्ती झाल्याची माहिती त्याने दिली आहे.

फेसबुक आणि ट्विटरवर एक छानसा फोटो पोस्ट करत त्याने ही आनंदाची बातमी साऱ्यांना सांगितली. “मुलगी झाली”, असं कॅप्शन देत त्याने फोटो पोस्ट केला आहे. “माझी चिमुकली राजकुमारी, या जगात तुझं स्वागत आहे. तुझ्या येण्याने मी खूपच आनंदी झालो आहे”, असा मजकूर फोटोवर लिहिण्यात आला आहे.

उमेश यादवचा १६ एप्रिल २०१३ ला दिल्लीची फॅशन डिझायनर तानया वाधवा हिच्याशी साखरपुडा झाला. त्यानंतर २९ मे २०१३ रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकले. उमेशची पत्नी तानिया त्याच्यासोबत IPL 2020 मध्ये दिसून आली.

तानया आणि उमेश यादव (फोटो सौजन्य- आयपीएल.कॉम)

 

सुरूवातीच्या काळात उमेश यादव झारखंडमध्ये वास्तव्यास होता. पण काही कौटुंबिक समस्यांमुळे तो नागपुरात स्थायिक झाला. लग्नानंतर सात वर्षांनी उमेश-तानया पहिल्यांदा आई-बाबा झाले.