भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साऊथम्प्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे काल शुक्रवारी (१८ जून) निधन झाले. मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू हातात काळ्या रंगाचे आर्मबँड घालून मैदानात उतरले आहेत. करोनाशी झुंज देणाऱ्या मिल्खा सिंग यांनी वयाच्या ९१व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

मिल्खा सिंह यांचा जन्म २० नोव्हेबर १९२९ रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. १९५८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील २०० आणि ४०० मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. मिल्खा सिंह यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून ४६.६ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर २०० मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. मिल्खा यांनी ही धाव केवळ २१.६सेकंदात पूर्ण केली. १९६२मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंह यांनी ४०० मीटर आणि ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. १९५९मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

 

भारतासह संपूर्ण जग ज्या सामन्याची वाट पाहत होते, तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कालपासून सुरू होणार होता, मात्र पावसाने हजेरी लावल्याने या सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. दोन्ही संघात नाणेफकही होऊ शकली नाही. मात्र आता दुसऱ्या दिवशी पाऊस ओसरला आहे. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला असून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.