विशाखापट्टणमच्या मैदानात रोहितने आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेतला. एकदिवसीय, टी २० आणि कसोटी या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून शतक झळकावणारा रोहित शर्मा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. दणकेबाज खेळी करत रोहितने १७४ चेंडूंचा सामना केला आणि १२ चौकार व ५ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ११५ धावा केल्या. सलामीवीर म्हणून खेळताना पहिल्याच सामन्यात रोहितने दमदार खेळी केल्यामुळे त्याची सर्वत्र स्तुती करण्यात येत आहे, पण तशातच भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने त्याला एक सूचक सल्ला दिला आहे.

“फलंदाजाची विचारसरणी कशी आहे हे कसोटी क्रिकेटमध्ये महत्त्वाचे असते. ज्या फलंदाजाला सलामीला खेळायचे आहे, त्याची विचारसरणी ही इतर फलंदाजांपेक्षा वेगळी असणे गरजेचे आहे. सेहवागने जेव्हा कसोटीत सलामीला प्रथमच फलंदाजी केली होती, तेव्हा त्यानेही इंग्लंडविरूद्ध शतक ठोकले होते आणि वाहवा मिळवली होती. पण नंतर त्याच्या आयुष्यात कठीण काळ आला. त्यालाही त्या गोष्टीचा सामना करावा लागला. त्यामुळे केवळ आकडेच नव्हेत, तर तुम्ही संघासाठी किती योगदान देता हे देखील महत्त्वाचे आहे”, असा सल्ला सचिनने रोहितला दिला.

सेहवाग सलामीला खेळताना त्याची एक अनोखी विचारसरणी होती. एकदिवसीय सामने असो किंवा कसोटी सामने असोत, त्याचा खेळण्याचा दृष्टिकोम मुळातच सारखा असायचा. त्याचा आक्रमक पवित्रा हा त्याच्या स्वभावात होता. त्यामुळे तो यशस्वी ठरला. त्यामुळे सलामीवीर म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर कामगिरीत सातत्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे”, असेही सचिन म्हणाला.

‘रोहित हिट है भाई!’; हिटमॅनच्या खेळीवर हरभजन फिदा

दरम्यान, दोन्ही फलंदाजांनी पहिल्या सत्रातील सुरुवातीचा अर्धा तास संयमी खेळ केला. यानंतर खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर दोघांनीही आपल्या ठेवणीतले फटके खेळत आफ्रिकन गोलंदाजांना पुरतं बेजार केलं. भारताची ही जोडी फोडण्यासाठी आफ्रिकन कर्णधार फाफ डू प्लेसिसने बरेच प्रयत्न केले, मात्र भारतीय फलंदाजांनी त्यांना दाद दिली नाही.