भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे. न्यूझीलंडच्या संघावर टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. सलामीवीर शिखर धवनने दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार विराट कोहलीसोबत केलेल्या भागीदारीच्या जोरावर भारताला हा विजय मिळवता आला. विजयासाठी भारताला दिलेले १५६ धावांचे आव्हान भारताने अवघ्या ३५ षटकात पूर्ण केले. या बरोबरच भारताने तब्बल १० वर्षानंतर न्यूझीलंडच्या भूमीत न्यूझीलंडला पराभूत करण्याची किमया केली. आता या मालिकेतील दुसरा सामना प्रजासत्ताक दिनी (२६ जाने.) होणार आहे. मात्र या तारखेला झालेल्या क्रिकेट सामन्यात भारताचा इतिहास फारसा चांगला नाही.

२६ जानेवारीला आजपर्यंत भारताने एकूण ५ सामने खेळले आहेत. यात एक कसोटी, ३ एकदिवसीय आणि १ टी२० सामन्यांचा समावेश आहे. मात्र यातील केवळ एकच सामना भारताला जिंकता आला आहे. भारताने २६ जानेवारी १९६८ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. त्यात भारताला १४४ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २६ जानेवारी १९८६ ला भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामना खेळला होता. त्यात भारत ३६ धावांनी पराभूत झाला होता. २६ जानेवारी २००० रोजी ऑस्ट्रेलियाबरोबर झालेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने १५२ धावांनी विजय मिळवला होता. तर २६ जानेवारी २०१५ ला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकदिवसीय सामना अनिर्णित राहिला.

२६ जानेवारी २०१६ ला खेळण्यात आलेला टी२० सामना मात्र भारताला जिंकता आला. हा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आला होता. या सामन्यात भारताला ३७ धावांनी विजय मिळवणे शक्य झाले होते. त्यामुळे सध्या तरी २६ जानेवारीला खेळण्यात आलेल्या सामन्यातील भारताच्या विजयाची टक्केवारी ही सुमारे १७ टक्के आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारत ही आकडेवारी बदलण्यात यशस्वी होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.