माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगचे मत

नवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनीमध्ये तडाखेबंद खेळी करण्याची क्षमता आहे. केवळ संघ व्यवस्थापनाने त्याला सुरुवातीपासूनच फटकेबाजी करण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे, असे मत फिरकीपटू हरभजन सिंगने व्यक्त केले.

धोनी त्याच्या शैलीनुसार प्रारंभी सावध तर अखेरच्या क्षणी तुफानी खेळी करीत भारतीय संघाला विजय मिळवून देत आला आहे. मात्र, हरभजन सिंगच्या मतानुसार धोनीला प्रारंभापासून फटकेबाजीची मुभा मिळायला हवी. ‘‘मैदानावर दाखल झाल्यापासूनच धोनीने आक्रमक फलंदाजी केली तर तो अधिक प्रभावी असतो. त्यामुळे धोनीला पाचव्या क्रमांकावर पाठवून मनमोकळेपणे खेळू द्यावे. धोनी आणि हार्दिक पंडय़ाला व्यवस्थापनाने कोणतीही आडकाठी न करता त्यांच्या शैलीनुसार खेळू दिल्यास ते अधिक योग्य होईल,’’ असे मत हरभजनने व्यक्त केले.

‘‘शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल हे भारताच्या डावाची उभारणी चांगली करू शकतात. त्यानंतर येणाऱ्या धोनीला आक्रमणाचे स्वातंत्र्य मिळायला हवे. मधल्या षटकांमध्ये जेव्हा मिचेल सँटनर आणि नॅथन लिऑनसारखे फिरकीपटू गोलंदाजी करतील, त्या वेळी धावगती वाढवण्यासाठी धोनीची फटकेबाजी उपयुक्त ठरू शकते. धोनीत अद्यापही उत्तुंग षटकार मारण्याची क्षमता आहे, हे त्याने आयपीएलमध्ये दाखवून दिले आहे,’’ असेही हरभजन म्हणाला.

भारतीय संघासाठी चौथ्या आणि सहाव्या क्रमांकावरील फलंदाजी हीच डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. चौथ्या क्रमांकावर राहुलशिवाय भारताकडे अन्य कोणताही चांगला पर्याय नाही, तर सहाव्या क्रमांकावर येणाऱ्या केदार जाधवला विश्वचषकाला सुरुवात होण्याआधीच पूर्णपणे तंदुरुस्त व्हावे लागेल. हे दोन्ही क्रमांक खूप महत्त्वाचे असल्याने त्यातून भारतीय संघ कसा मार्ग काढतो, त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे, असेही हरभजन म्हणाला.

भारताच्या दृष्टीने सामना पालटण्याची क्षमता असलेल्यांमध्ये कर्णधार विराट कोहली तसेच गोलंदाजीत जसप्रीत बुमरा यांचा समावेश आहे. सचिन तेंडुलकरने बुमराला जगातील सध्याचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणून गौरवले आहे. त्याने आपल्या गोलंदाजीने चांगला ठसा उमटवला आहे. जर भारतीय संघातून त्याचे नाव बाजूला काढले तर भारतीय संघ हा हृदयाविना असलेल्या शरीरासारखा भासेल. तो भारतीय गोलंदाजीचा कोहली आहे. माझ्या मतानुसार भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील,’’ असेही हरभजनने सांगितले.