टय़ुनिशियाच्या ओन्स जबेरला मंगळवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयश आले असले तरी तिच्या स्वप्नवत वाटचालीमुळे अरब देशांमध्ये पुन्हा एकदा टेनिसक्रांती घडून आली आहे.

२६ वर्षीय जबेरला डॅनिल कॉलिन्सने पराभूत केले. मात्र याच स्पर्धेतील पहिल्या फेरीत कॅरोलिना प्लिस्कोव्हा आणि इजिप्तच्या मायर शेरिफ यांच्यातील लढत पाहून जबेर भावूक झाल्याचे दिसून आले. त्याशिवाय चौथ्या लढतीत पराभूत झाल्यानंतरही जबेरच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. जबेर आणि शेरिफ यांच्या रुपात प्रथमच अरबच्या दोन महिला एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळत होत्या. त्यामुळे अरब देशांमधील नागरिकांसाठी हा अभिमानाचा क्षण होता.

‘‘ज्यावेळी मी शेरिफला खेळताना पाहिले, तेव्हा मला अश्रू अनावर झाले. अरब जगतातील दोन महिला प्रथमच एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकत्र सहभागी झाल्या होत्या. कोणालाही यावर विश्वास बसणार नाही,’’ असे जबेर म्हणाली.