भारत आणि न्यूझीलंडमध्ये आजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा महामुकाबला खेळवला जाणार होता, मात्र पावसाने या सामन्यात व्यत्यय आणला आणि पहिला दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आल्याने आता हा सामना २३ जूनपर्यंत चालणार आहे. सहसा कसोटी सामना पाच दिवसांचा असतो. पण एक कसोटी सामना होता, जो पाच नव्हे, सहा नव्हे, तर तब्बल १२ दिवस सुरू होता.

दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी म्हणजेच १९३९मध्ये हा सामना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघात खेळवला गेला होता. डर्बनमध्ये रंगलेला हा सामना विश्रांती आणि वॉशआऊटमुळे १२ दिवसानंतरही अनिर्णित राहिला होता. हा सामना या मालिकेचा पाचवा आणि अंतिम सामना होता आणि या मालिकेत इंग्लंडचा संघ १-० ने आघाडीवर होता.

हेही वाचा – “पावसानं भारताला वाचवलं”, मायकेल वॉन पुन्हा भारतीयांच्या निशाण्यावर

तिसरा दिवस म्हणजे रविवार हा विश्रांतीचा दिवस होता, तर चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा डाव ५३० धावांवर आटोपला. दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंडने प्रत्युत्तरादाखल ३५ धावा केल्या. पाचव्या दिवशी इंग्लंडने सात बाद २६८ धावा केल्या. यानंतर पाहुणा संघ पहिल्या डावात ३१६ धावांवर बाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेला २१४ धावांची आघाडी मिळाली.

सहाव्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने दुसर्‍या सत्रात ३ बाद १९३ धावा केल्या आणि आपली आघाडी मजबूत केली. संघाचा दुसरा डाव ४८१ धावांत आटोपला आणि इंग्लंडला विजयासाठी ६९६ धावांचे लक्ष्य दिले. आठव्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंडने पहिल्या विकेटसाठी २५३ धावा केल्या होत्या. नवव्या दिवसाचा खेळ पावसामुळे पूर्णपणे धुऊन गेला. दहावा दिवस रविवार असल्याने विश्रांतीचा दिवस होता. अकराव्या दिवशी इंग्लंडने तीन बाद ४९६ धावा केल्या आणि विजयासाठी त्यांना आणखी २०० धावांची आवश्यकता होती. १९३०मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात किंग्स्टन येथे खेळल्या गेलेल्या सामन्याला मागे टाकत हा सर्वात मोठा ठरला होता.

हेही वाचा – WTC Final: India Vs NZ पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया

विजयाच्या जवळ पोहोचला होता इंग्लंड संघ

इंग्लंडच्या संघाला केप टाऊन गाठायचे होते. त्यामुळे इंग्लंडचे खेळाडू त्याच दिवशी संध्याकाळी निघणार असल्याने बारावा दिवस सामन्याचा शेवटचा दिवस म्हणून घोषित करण्यात आला. शेवटच्या दिवशी इंग्लंडने चहापानापर्यंत ५ बाद ६५४ धावा केल्या होत्या. विजयासाठी त्यांना अवघ्या ४२ धावांची गरज होती. त्यांच्याकडे पाच फलंदाजही शिल्लक होते, पण त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला आणि सामना पुढे जाऊ शकला नाही.