भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू तसेच लंडन ऑलिंपिकमधील ब्राँझ पदक विजेती सायना नेहवालला उद्यापासून सुरु होणाऱ्या थायलंड ओपन २०२१ बॅडमिंटन स्पर्धेत खेळण्याची परवानगी देण्यात येईल. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनकडून सायनाचा करोना रिपोर्ट् पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले होते. तिला बँकाँकमध्ये १० दिवस आयसोलेशनमध्ये रहाण्यास सांगण्यात आले होते.

मात्र बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियामधील सूत्रांनी सायनाचा करोना रिपोर्ट् पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तिला उद्यापासून स्पर्धेत सहभागी होता येईल असे सांगितले. इंडिया टुडेने बॅडमिंटन असोसिएशनमधील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला करोनाची लागण झाली आहे. करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सायना नेहवालनं मंगळवारपासून सुरू होणाऱ्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे असे वृत्त सकाळी देण्यात आले होते.

करोनामुळे जवळपास १० महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धाना सुरुवात होत आहे. थायलंडमध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने चीनने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. जगातील अव्वल खेळाडू केंटो मोमोटा करोनाग्रस्त आढळून आल्याने जपानने अखेरच्या क्षणी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला.