चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेच्या वापराला बंदी घातल्यामुळे सामन्यात स्पर्धा राहणारच नाही, असे मत भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने व्यक्त केले. ‘‘चेंडूला लकाकी आणली नाही तर फलंदाजांसाठी सोपे आव्हान असेल,’’ असेही इशांत म्हणाला.

‘‘लाल रंगाच्या चेंडूला लकाकी आणली नाही तर तो चेंडू स्विंग होणार नाही. फलंदाजांसाठी मात्र अनुकूल स्थिती असेल. सामन्यात स्पर्धाच शिल्लक राहणार नाही आणि पूर्णपणे फलंदाजांचे वर्चस्व राहील. चेंडूला थुंकी लावायची नाही, हे प्रत्येक गोलंदाजाला आणि खेळाडूला लक्षात ठेवावे लागणार आहे. लाल चेंडूने खेळताना नियमाप्रमाणे आम्हाला सर्वतोपरी काळजी घ्यावी लागणार आहे,’’ असे ईशांतने म्हटले.

चेंडूला लकाकी फिरकीपटूंसाठी गरजेचे -चहल

चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करण्यावर घातलेली बंदी ही वेगवान गोलंदाजांप्रमाणे फिरकीपटूंसाठीही नुकसानकारक आहे, असे भारताचा फिरकीपटू यजुर्वेद्र चहलने सांगितले. ‘‘चेंडू स्विंग होण्याकरिता थुंकी लावण्यासारख्या नैसर्गिक गोष्टींचा उपयोग हा वेगवान गोलंदाजांप्रमाणे फिरकीपटूंनाही उपयोगी पडतो. चेंडूला चांगले वळण मिळते. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू म्हणून गोलंदाजी करताना चेंडू वळले नाहीत तर फलंदाजांसाठी फटकेबाजी करणे सोपे होईल. जगातील प्रत्येक गोलंदाजावर त्याचा परिणाम होईल. त्यावर काहीतरी पर्याय शोधणे गरजेचे आहे,’’ असे चहलने सांगितले.