भारतात क्रिकेट मालिका खेळणे पाकिस्तानला शक्य नसल्याचे स्पष्टीकरण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी दिले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी डिसेंबरमध्ये भारत-पाक मालिका भारतात खेळविण्याचा प्रस्ताव ठेवला असला तरी सामंजस्य करारानुसार ती संयुक्त अरब अमिराती(यूएई) येथे खेळविण्यात यावी, असे मत शहरयार खान यांनी व्यक्त केले आहे.

ते म्हणाले की, पाकिस्तानने भारतात खेळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. यूएईत भारताने सामना न खेळण्यामागे नक्की काय कारण आहे हे अद्यापही मला समजलेले नाही. पाकिस्तानला डिसेंबरमध्ये भारताविरुद्ध मालिका खेळण्यास काहीच हरकत नाही. मात्र, या मालिकेच्या आयोजनाचा मान आमचा असताना आम्ही ती भारतात का खेळावी. सामंजस्य करारानुसार यूएई येथे ती खेळवली गेली पाहिजे. भारतात आमच्या संघाच्या सुरक्षेचा प्रश्न आहेच. तसेच जवळपास ५० कोटी डॉलरची मिळकत या मालिका आयोजनातून आम्हाला अपेक्षित आहे.

भारताने यूएईत आयपीएलचे सामने खेळले आहेत मग पाकिस्तानविरुद्धची मालिका खेळण्यास विरोध का? असा सवालही शहरयार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

दरम्यान, भारताप्रमाणेच पाकिस्तानातही या क्रिकेट मालिकेच्या आयोजनाचे भवितव्य तेथील सरकारच्या भूमिकेवर अवलंबून आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड देखील अद्याप या मालिकेसाठी सरकारच्या परवानगीच्या प्रतिक्षेत आहे.