‘‘माणसांकडून काही वेळा अजाणतेपणे चुका होतात. स्टीव्हन स्मिथ व त्याच्या सहकाऱ्यांकडून गैरकृत्य झाले आहे, त्याबद्दल त्यांना शिक्षाही होत आहे. त्यांच्यावर टीका करताना अन्य खेळाडू व संघटकांनी तोल सांभाळावा,’’ असे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी सांगितले.

वॉ यांनी समाजमाध्यमावर असे म्हटले आहे की, ‘‘खेळाची प्रतिष्ठा राखण्यासाठी जे काही सकारात्मक उपाय केले जात आहेत, त्याला माझा पाठिंबाच असेल. बदनाम झालेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेटला पुन्हा सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी मंडळाला मदत करण्यास तयार आहे. आमच्या खेळाडूंवर चाहत्यांचा विश्वास निर्माण होण्यासाठी मंडळाकडून निश्चितपणे चांगले प्रयत्न होतील. स्मिथकडून झालेल्या कृत्याबद्दल मीदेखील नाराज झालो आहे.’’

‘‘संघातील प्रत्येक खेळाडूकडे संशयास्पदरीत्या पाहिले जाऊ नये, कारण संघातील प्रत्येक खेळाडू काही वाईट नसतो. एक-दोन खेळाडूंच्या चुका अन्य खेळाडूंच्या माथी मारणे अयोग्य असते. जागतिक स्तरावर आपल्या देशाकडून खेळण्यासाठी अनेक युवा खेळाडू स्वप्न पाहात आहेत. त्यांना प्रेरणा मिळेल यासाठी ज्येष्ठ खेळाडूंनी टीका करताना या युवा खेळाडूंमध्ये नैराश्य निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे,’’ असेही वॉ यांनी सांगितले.